औरंगाबाद : कामगार मजुरांचा पिकअप उलटला; १ ठार तर १४ जखमी | पुढारी

औरंगाबाद : कामगार मजुरांचा पिकअप उलटला; १ ठार तर १४ जखमी

पाचोड (औरंगाबाद), पुढारी वृत्‍तसेवा : कामगार मजुरांना घेऊन जाणारा  पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने ताे उलटला. या अपघातात 1 ठार तर 14 जण  जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना औरंगाबाद – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता.पैठण) बायपासवर शनिवारी (दि.21) सकाळी साडे नऊ वाजता घडली.

सर्व अपघातग्रस्त हे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्यावर पाचोड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार  करुन तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हालविण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. गुलाबसिंग तेजलाल वळवी (वय 20, रा.अक्कलकुव्वा, जि.नंदुरबार) असे मयताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबार येथील कामगार बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कामकाजासाठी आले होते. तेथील कामे संपल्यानंतर हे सर्व जण कन्नडला येत होते. दरम्यान, भरधाव वेगातील पिकअप (क्र.एमएच २० ईजे ०२८७ ) हा पाचोड बायपासजवळ येताच एका वाहनाने हुलकावणी दिली. यामुळे पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. या अपघातात पिकअपमधील चंदन विका (वय १८), नकु टेड्या (वय १५), सुन्या माऱ्या, ओन्या दिवाल्या (वय १५), विना क्रांती (वय १६), दिलीप सिंग्या (वय २०), देविलाल मोर्या (वय २५), आशा जयशिग (वय २५), रजिता मोर्या (वय १७), सुनिल मोर्या (वय २०), रोहीता आरशिता (वय १९) यांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.

तर सुनील गोसावे (वय १८),विनोद क्रांती गोसावे,रंजिता मोर्या आदी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात घडताच जवळपासचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने टोलनाक्या वरील रुग्णवाहितून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोपचार करुन  तातडीने सर्व रुग्‍णांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू  झाला तर तिघांची प्रकृत्ती गंभीर आहे.

पाचोड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा  

सोलापूर : वरदायनी उजनी धरणाने गाठला तळ 

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

औरंगाबाद हादरले : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा भोसकून खून 

Back to top button