Nagar News : अकोलेत आरोग्यसेवेचा उडाला बोजवारा | पुढारी

Nagar News : अकोलेत आरोग्यसेवेचा उडाला बोजवारा

अकोले : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जनतेला आरोग्यविषयक सोईसुविधा तत्काळ व मोफत मिळाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे.परिणामी अकोले तालुक्यात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
अकोले तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र 10 तर 72 उपकेंद्रे असून सुमारे अडीच लाख जनतेची आरोग्यसेवा या केंद्रावर अवलंबून आहे.

आदिवासी भागातील मोलमजुरी करणार्‍या सर्वसामान्य कुटुंबियांना मजुरी बुडवून शहरात उपचार घेणे परवडत नसल्याने या आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. परंतु, मवेशीसह काही जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी व पुरेसे कर्मचार्‍यांच्या वानवा असून ही स्थिती गेली कित्येक वर्षे आहे. ब्राह्मणवाडा, मवेशी, लाडगाव, म्हाळादेवी, सुगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 8 वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहेत.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी 1, आरोग्य सहाय्यक 6, आरोग्य सेवक- सेविका 16, परिचर 11, सफाई कामगार 5 असे एकूण 50 पदे अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णसेवेवर परिणाम होत आहेत.तसेच केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये दुर्गम भागामध्ये कित्येक वाड्या, वस्ती वसलेले आहेत. त्यामुळे तेथील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आल्यानंतर तेथे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना परत माघारी जाव लागत आहे. रिक्त पदांमुळे प्रसूती सेवा देखील काही आरोग्य केंद्रात बंद आहे.

त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोणीही वाली उरला नसल्याची बाब स्थानिकांनी निदर्शनास आणली आहे. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जनसामान्यांतुन होत आहे.
शासकीय कामात पारदर्शकता यावा तसेच नागरिकांना हेलपाटे मारावे लागु नये, म्हणून सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना कार्यालय किंवा आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक हजेरी मशिन बसविण्यात आले आहेत.

परंतु अकोले तालुक्यातील आदिवासी भागात नेटवर्क नसल्याने अनेक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर आळीपाळीने (ड्युटी) कर्तव्याची जबाबदारी पाच – पाच दिवस वाटुन घेताना डॉक्टर, औषध निर्माता, आरोग्य सहाय्यक (महिला, पुरुष) हजेरी रजिस्टरवर कधी – मधी किंवा पाच दिवसाच्या उपस्थितीच्या आधीमधी सह्यावरुन दिसुन येतात. मात्र याचा परिणाम रुग्ण सेवेवर होताना दिसुन येत आहे. त्यामुळे ‘आपण दोघे सख्ख्ये भाऊ आणि मिळुन खाऊ’ या म्हणीचा अनुभव रुग्णांना येत आहे.

रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्रांना कुलूप

आदिवासी भागातील गरोदर स्त्रियांना प्रसूतीसाठी तसेच सर्पदंश व इतर किरकोळ आजार, छोटे अपघातातील रुग्ण यांना रात्री-अपरात्री तत्काळ प्राथमिक उपचार मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र उपयोगी पडते. सध्या तालुक्यात सर्दी-खोकला-ताप यासह विविध साथरोगांच्या आजाराचे रुग्ण वाढले. परंतु, या ठिकाणी रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने आरोग्य केंद्र व उपकेंद्राला कुलूप असते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा

शेतकर्‍यांना एक रुपयात रब्बी पीकविम्याचा लाभ

पुणे जिल्ह्यातील 37 ग्रा.पं.बिनविरोध

Nashik News : पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा गळा घोटणाऱ्यास जन्मठेप

Back to top button