शेतकर्‍यांना एक रुपयात रब्बी पीकविम्याचा लाभ | पुढारी

शेतकर्‍यांना एक रुपयात रब्बी पीकविम्याचा लाभ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात रब्बी हंगामात गहू बागायत, बागायत व जिरायत रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा या 6 अधिसूचित पिकांसाठी शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीकविमा योजनेत एक रुपया भरून सहभाग घेता येणार आहे. 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिश्श्याचा विमा हप्ता रक्कम राज्य सरकारमार्फत भरण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 या तीन वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

रब्बी हंगामात या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी जिरायत व बागायत ज्वारीकरिता 30 नोव्हेंबर, गहू बागायत, हरभरा, रब्बी कांदाकरिता 15 डिसेंबर आहे. तर उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग पिकांकरिता 31 मार्च आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय हे ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकारमार्फत भरण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना केवळ एक रुपया भरून https://pmfby.gov.in येथे स्वतः शेतकर्‍यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रांमार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्रधारकाला (सीएससीधारक) विमा कंपनीमार्फत प्रतीअर्ज 40 रुपये देण्यात येतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी सामूहिक सेवा केंद्रधारकाकडून केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी, असे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी पत्रकान्वये कळवले आहे.

अतिरिक्त पैसे मागितल्यास संपर्क साधा

योजनेतील सहभागासंदर्भात शेतकर्‍यांना काही अडचण आल्यास तसेच सीएससीवर अतिरिक्त रकमेची मागणी झाल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, नजीकची बँक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा. कर्जदार शेतकर्‍यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणार्‍या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल, तर तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणार्‍या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.

विमा कंपनीचे नाव आणि संबंधित जिल्हे

(1) ओरिएन्टल इन्शुरन्स – अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा.
(2) आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स – परभणी, वर्धा, नागपूर.
(3) युनिव्हर्सल सोम्पो – जालना, गोंदिया, कोल्हापूर.
(4) युनायटेड इंडिया इन्शुरन्स – नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
(5) चोलामंडलम एम.एस. – औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड.
(6) भारतीय कृषी विमा कंपनी – वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, बीड.
(7) एचडीएफसी जनरल – हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव.
(8) रिलायन्स जनरल इन्शुरन्स – यवतमाळ, अमरावती, गडचिरोली,
(9) एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स – लातूर

हेही वाचा 

Nashik News : पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा गळा घोटणाऱ्यास जन्मठेप

Pune News : पुणेकर मुलीचे डच भाषेत पाठ्यपुस्तक

Pune News : पालिकेकडून 13 हॉटेलच्या अनधिकृत शेडवर कारवाई

Back to top button