नगर : ‘एलसीबी’ने पुकारले ‘ऐलान ए जंग’! | पुढारी

नगर : ‘एलसीबी’ने पुकारले ‘ऐलान ए जंग’!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमने 1 एप्रिल ते 31 जुलै 2023 या कालावधीत अवैध धंद्यांवर धडक कारवाया करीत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. खून, दरोडा, जबरी चोरी, वाळू तस्करी, गावठी कट्ट्यांची तस्करी, जुगार, गुटखा तस्करी असे गंभीर गुन्हे करणार्‍या 543 आरोपींच्या मुसक्या एलसीबीने आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये ‘खाकी’ची दहशत पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारी उखडून फेकण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी यंत्रणेला गुन्हेगार व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या चार माहिन्यांत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंदे चालविणार्‍यांना ‘खाकी’चा हिसका दाखविला आहे. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची टिम अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी धाडसत्र राबवित आहे. तसेच, खून, जीवघेणे हल्ले, दरोडे, जबरी चोरी, आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात एलसीबीला यश आले आहे. गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी गजाआड केले.

संगमनेरमधील ‘जलजीवन’चे लाखोंचे पाईप चोरणार्‍या आंतरराज्यीय टोळीला एलसीबीने अटक केली व उत्तर प्रदेशातून चोरीला गेलेले 35 लाखांचे तीन ट्रक भरून लोखंडी पाईप हस्तगत केले. त्यासोबतच चांदा दरोडा, राजूरमधील महिलेचा खून, कानडगाव दरोडा, अंकुश चत्तर व भागानगरे हत्याकांड या गुन्ह्यांची उकल एलसबीने केली. कडक कारवाई करून पोलिसांनी गुन्हेगारांची नाकाबंदी केली असून, ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’, असा इशारा पोलिस निरीक्षक आहेर यांनी आपल्या कारवाईतून दिला आहे.

साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त
अवैध धंदे चालविणार्‍यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आपल्या पथकांना आदेश दिले आहेत. कायदा मोडून गुंडगिरी करणारेही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने चार महिन्यांत अवैध धंद्यांवर धाडसत्र राबवून सहा कोटी 34 लाख 17 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा :

मराठा आंदोलन पडसाद : खेड तालुक्यात कडकडीत बंद !

मराठा आंदोलन पडसाद : भवानीनगर मध्ये मराठा समाजाचा मोर्चा

Back to top button