श्रीरामपुरात खरीप पिकांनी टाकल्या माना | पुढारी

श्रीरामपुरात खरीप पिकांनी टाकल्या माना

टाकळीभान(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीपाची पिके जळू लागल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला असून मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पहात आहे. टाकळीभानसह परिसरात झालेल्या अत्यल्प पडलेल्या पावसावर बळीराजाने खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत. मात्र आता पावसा अभावी पिके माना टाकू लागले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

यंदाचा पावसाळा तसा जेमतेमच झालेला असून 7 जून रोजी मृग नक्षत्राचा पाऊस पडेल व खरीपाच्या पेरण्या जोमाने होतील अशी आशा शेतकरी मनी बाळगून होता. मात्र पाऊस हा तब्बल महिनाभर उशीराने पडला व तोही जेमतेमच पडला. या पडलेल्या अत्यल्प पावसावर बहुतांशी शेतकर्‍यांनी खरीपाच्या पिकाच्या पेरण्या केल्या.

पेरणी केलेली पिके उतरून पडल्यावर शेतकर्‍यांना जोरदार पावसाची अपेक्षा होती. मात्र पुढे जुलै मध्येही जोरदार पाऊस न होता. रिमझिम स्वरूपाचा पाऊस श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्व भागातील टाकळीभानसह भोकर, खोकर, कमालपूर, घुमनदेव, घोगरगाव, बेलपिंपळगाव, खिर्डी, वांगी, गुजरवाडी, कारवाडी, पाचेगाव आदी ठिकाणी पडला. या रिमझिम पावसाने कपाशी, बाजरी, सोयाबीन, मका, तुर आदी पिकांची कशीबशी उगवण झाली. मात्र पावसाने दडी मारल्याने आता पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या आहेत.

राज्यात काही भागात नद्या, नाले दुथडी भरून पडत असणारा जोरदार तुफानी पाऊस श्रीरामपूर तालुक्यात मात्र बरसलाच नाही. जेमतेम बुरबुरीवर व जवळ असलेल्या विहीरी अथवा बोअरच्या पाण्यावर शेतकर्‍यांनी पिके कशीबशी वाचवली. मात्र आता ऑगस्ट महिन्यात तरी बर्यापैकी पाऊस होईल, अशी अपेक्षा बळीराजाला असताना गेल्या आठ दहा दिवसांपासून पडणार्‍या रिमझिम पाऊसानेही आता दडी मारली. परिणामी पडणारे ऊन व जोरदार सुटणार्‍या वार्‍याने खरीपाचे पिके सुकून चालली आहेत.

टाकळीभानसह परिसरात मोठा पाऊसच न झाल्याने परिसरातील विहीरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे आता विहीरींनी तळ गाठला आहे. मध्यतंरी झालेल्या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील काही शेतकर्‍यांच्या विहीरींना व बोअरवेलला काही प्रमाणात पाणी वाढल्याने त्या पाण्याचा वापर करून कशीबशी पिके वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. मात्र आता सध्या या पाण्यानेही तळ गाठल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.

सुरूवाती पासूनच जेमतेम पडलेल्या पावसा मुळे अगोदरच पिकांची वाढ खुंटलेली असतांना आता या बुरबुर पावसानेही उघडीप दिली.
पिकांवर रोग-किडींचा प्रार्दुभाव जुन महिन्याच्या दुसर्‍या पंधरवाड्यात समाधानकारक पाऊस नसतांना खरीप हंगाम वाया जावू नये म्हणून जेमतेम ओलीवर शेतकर्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर पडलेल्या रिमझिम पावसावर तग धरलेली पिके मध्यंतरीच्या कडक उन्हामुळे अखेरची घटका मोजत आहेत.ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

हेही वाचा

श्रीगोंदा : शेतकर्‍यांचा सर्वच कांदा 2410 रुपयांप्रमाणे घ्या : राजेंद्र नागवडे

अहमदनगर जिल्ह्यातील शाळांची तपासणी सुरू

पुणे : शिवगंगा खोर्‍यातील कांदा उत्पादक अडचणीत

Back to top button