पुणे : शिवगंगा खोर्‍यातील कांदा उत्पादक अडचणीत | पुढारी

पुणे : शिवगंगा खोर्‍यातील कांदा उत्पादक अडचणीत

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने एकदमच कांदा निर्यात शुल्कवाढीत तब्बल चाळीस टक्के वाढ करून शेतकर्‍यांना अडचणीत आणले. याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? हा मोठा प्रश्न नवविकास युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी उपस्थित केला आहे. या वर्षी एप्रिल, मेदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने कांदा खराब होऊन उत्पन्नात घट झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर त्यातील साठवणूक केलेला कांदा व्यापार्‍यांपेक्षा शेतकर्‍यांकडे जास्त आहे. निर्यात शुल्कवाढीमुळे व्यापारी कांदा खरेदी करणार नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कांदा विक्री केला, तरी आर्थिक अडचण व राखून ठेवला तरी नासधूस होऊन अडचण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने कांदा निर्यात शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शिवगंगा खोर्‍यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात शुल्कवाढ ही कांद्याचा भाव स्थिर राहावा यासाठी केली असून, यामध्ये शासनाचाच फायदा होईल, असे गणित स्पष्टपणे दिसत आहे. ही तर 2024 मधील निवडणुकीची तयारी चालू केली आहे, असे म्हणावे लागेल.
मागील काही वर्षांपूर्वी कांद्याच्या प्रश्नांमुळेच सरकार कोसळले होते, याचा विसर केंद्र सरकारला पडलेला दिसत आहे. शेतकरी काय करू शकतो, याची प्रचिती पुढील निवडणुकीत त्यांना निश्चितच दिसून येईल. त्यामुळे शासनाने या शुल्कवाढीवर फेरविचार करून शुल्कवाढ निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी नवविकास युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी केली आहे.

Back to top button