मावळ क्रीडा संकुलासाठी लवकरच संयुक्त बैठक | पुढारी

मावळ क्रीडा संकुलासाठी लवकरच संयुक्त बैठक

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे, यासाठी मागील तीन वर्षांपासून आमदार सुनील शेळके सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत असून आज (दि.9) मुंबई मंत्रालय येथे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन क्रीडा संकुल उभारण्याच्या कामासंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली. क्रीडा मंत्र्यांनी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिले असल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, क्रीडाक्षेत्रात आपला नावलौकिक प्राप्त करता यावा, या उद्देशाने शासनाने ‘तालुका तिथे क्रीडा संकुल’ हे धोरण राबविले होते; परंतु मावळ तालुक्यात संकुल उभारण्याबाबत कुठलीही पावले उचलण्यात आली नव्हती.

आमदार शेळके यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला असून, पावसाळी अधिवेशनातदेखील प्रश्न उपस्थित केला व जांभूळ येथे क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. मावळ तालुक्याला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा असून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये शालेय स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत यश मिळविण्यासाठी सुसज्ज क्रीडांगणाअभावी ग्रामीण भागातील मुलांना विविध स्पर्धांना मुकावे लागते. क्रीडाक्षेत्रातील कौशल्य असूनही केवळ अद्ययावत व सुसज्ज क्रीडासंकुल नसल्यामुळे उदयोन्मुख खेळांडुनादेखील अडचणी येत आहेत.

तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून अद्ययावत व सुसज्ज क्रीडा संकुल उभे राहिल्यास खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील. मागील तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करूनही अद्याप ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे तालुक्यात क्रीडा संकुल उभारणेबाबत क्रीडामंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.

हेही वाचा : 

वाद एकाशी; हल्ला दुसऱ्यावरच ! स्वामी चिंचोली जवळील घटना

दिल्लीत महत्वपूर्ण ठिकाणी कलम 144 लागू

Back to top button