नगरमध्ये जमिनीच्या वादातून तिघांवर घातला ट्रॅक्टर | पुढारी

नगरमध्ये जमिनीच्या वादातून तिघांवर घातला ट्रॅक्टर

श्रीगोंदा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : लिंपणगाव येथे जमिनीच्या वादातून तिघांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून, तसेच तलवार, कोयता आणि लोखंडी टॉमीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सात जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू बाबा माने यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष माणिक भोंडवे, सागर भिकाजी भोंडवे, प्रसाद माणिक भोंडवे, संदीप किसन सूर्यवंशी, किरण भिकाजी भोंडवे, प्रवीण सोपानराव कुरूमकर (सर्व रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) व बापू लक्ष्मण कुरूमकर (रा. मुंढेकरवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी माने यांची लिंपणगाव शिवारात गट नं 236 मध्ये 66 गुंठे शेतजमीन असून या शेतजमिनीत 1 मे रोजी फिर्यादी हे गेले असता त्या ठिकाणी संतोष माणिक भोंडवे, बापू लक्ष्मण कुरूमकर आणि संदीप किसन सूर्यवंशी यांनी अनधिकाराने बांबूची कांद्याची चाळ बांधून त्यात कांदे टाकले असल्याचे दिसून आले. तसेच तेथे ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रक उभे करत अतिक्रमण केले असल्याचे दिसून आल्याने फिर्यादी यांनी आरोपींना माझे शेतात कांदे टाकू नका, वाहने उभी करू नका, असे सांगितले असता या गोष्टीचा त्यांना राग आला. आरोपींनी फिर्यादीला शेतातून बाहेर हो, असे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात करत, हातात दगड घेऊन तू इकडे आलास तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली होती या प्रकरणी पोलिस ठाण्यात दि.2 मे रोजी गुन्हा दाखल केली होती.

फिर्यादी हे दि. 3 मे रोजी दुपारच्या सुमारास मुलगा उदय बापू माने व भाऊ हनुमान बाबा माने यांच्यासह गाडी नं. एम.एच. 16. सी.क्यू. 9779 मधून शेतात गेले असता संतोष माणिक भोंडवे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर ट्रॅक्टर घातला. अन्य आरोपी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाचा आणि भावाचा मारण्यासाठी पाठलाग केला. किरण याने टॉमीने हनुमान माने याचे डावे हातावर मारुन जखमी केले. आरोपींनी मोटरसायकलवरून पाठलाग केला.

Back to top button