नगर तालुक्यात अवकाळीचा 11 गावांना फटका ! | पुढारी

नगर तालुक्यात अवकाळीचा 11 गावांना फटका !

शशिकांत पवार : 

नगर तालुका : तालुक्यात मागील पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका 11 गावांना बसला आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, फळबागांचेही नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
नगर तालुक्यात 18 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस, तसेच गारपिटीने सर्वच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. तर, काढणीला आलेला गहू, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संत्रा, आंबा फळबागांचे नुकसान झाले. वादळी वार्‍याने फळबागांचा मोहर गळून पडला.

गावरान कांदा, लसूण पिकांवर डाऊनी, मर, करपा, मवा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला, तर भाजीपाला पिकांवर मावा, अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. ज्वारी पिकांवर चिकटा पडल्याने सर्वच पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. लाल कांदा कवडीमोल दराने विकला गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची अवकाळी पावसाने पुरती वाट लावली. वातावरणातील बदलाचा फटका सर्वच पिकांना बसला असून, पिकांची वाताहात झाली.

खरीप पिकांचे उत्पादन अतिवृष्टीने पदरी पडले नाही. मूग, सोयाबीन, बाजरी पिके वाया गेली. लाल कांद्याच्या रोपांची वाताहात झाली. लाल कांदा, रांगडा कांद्याला भावच मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असतानाच अवकाळीचे संकट समोर आले.
चालू वर्षी मुबलक पाणी असल्याने गहू, हरभरा, गावरान कांदा, ज्वारी, चारा पिके व फळबाग या रब्बी पिकांमधून खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून येईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. परंतु, अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. चालू वर्षाची संपूर्ण खरीप व रब्बी हंगामातील पिके तोट्यात गेली आहेत.

मार्चमधील अवकळीचा फटका तालुक्यातील देहरे, विळद, अकोळनेर, पट्ट्यातील 11 गावांना जास्त बसला आहे. वातावरणातील या बदलाचा फटका संपूर्ण तालुक्यातील पिकांनाच बसला आहे. अवकाळी व गारपिटीमुळे एक हजार 32 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यातील 66 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले आहे. अवकाळीचा फटका एक हजार 742 शेतकर्‍यांना बसला असून, कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्यात आल आहेत.

शासनातर्फे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले. परंतु, वातावरणातील बदलाचा फटका सर्वच पिकांना बसला. गहू, कांदा, लसूण याबरोबर सर्वच पिकांच्या उत्पादनात रोगाच्या प्रादुर्भावामुळे घट होणार आहे. तरी, सर्व पिकांचा पंचनामा करून मदत मिळणे गरजेचे आहे.
                                                         – भाऊसाहेब काळे, शेतकरी, देहरे

खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेला. लाल कांदा, रांगडा कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला. भाजीपाल्यात नांगर फिरवण्याची वेळ आली. अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. चालू वर्षी संपूर्ण शेती तोट्यातच गेली. शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शासनाकडून त्वरित मदत मिळणे गरजेचे आहे.
                                                            – राजेंद्र शिंदे, शेतकरी, जेऊर

Back to top button