नगर : सरकारने 39 कोटींची कामे अडविली : आमदार संग्राम जगताप | पुढारी

नगर : सरकारने 39 कोटींची कामे अडविली : आमदार संग्राम जगताप

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या विकासासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण विविध योजनांंतर्गत सुमारे 39 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, विद्यमान सरकारने या कामांना स्थगिती दिली आहे. ही स्थगिती न उठविल्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

आमदार जगताप यांनी विधीमंडळाच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केले. शहर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामे करण्यासाठी अर्थसंकल्प 2022-23 मधून राष्ट्रीय महामार्ग 222 ते नगर-पुणे रस्ता (भूषणनगर लिंक रोड) काँक्रिटीकरण 15 कोटी रूपये, नेप्ती बाजार समिती रस्ता काँक्रिटीकरणासाठी 7 कोटी 60 लाख रूपये मंजूर केले होते. महापालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सोईसुविधांचा विकास करणे अंतर्गत दि.9 एप्रिल 2022 रोजी 10 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. या कामांवरील स्थगिती उठविण्याबाबत अधिवेशनात त्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.

शहरातील पोलिस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे निवासस्थान व नवीन कार्यालयीन इमारत बांधणे या कामाचा प्रस्ताव सन 2021 पासून मंजुरीसाठी प्रलंबित आहे. यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तारकपूर बसस्थानकाच्या विकासासाठी 7 कोटी व माळीवाडा बसस्थानकाच्या विकासासाठी 16 कोटींच्या कामांचा प्रस्ताव सन 2021 पासून मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

पर्यटन विकास योजनेंतर्गत 28 मार्च 2023 रोजी नगर-पुणे महामार्ग ते फुलसौंदर मळ्यापर्यंत सीना नदी सुशोभिकरणासाठी रूपये 3 कोटी, कल्याण रस्ता ठाणगे मळा ते अमरधामपर्यंत सीना नदी सुशोभिकरणासाठी 3 कोटी, असे एकूण 6 कोटी रूपये मंजूर करण्यात आले. परंतु, या रकमेच्या वापरासही विद्यमान सरकारने स्थगिती दिली आहे.

शहरासाठी मंजूर असलेली सुमारे 39 कोटी रूपयांची विकासकामे होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील व शहराच्या विकासाला गती प्राप्त होईल. या कामांची स्थगिती सरकारने न उठविल्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

Back to top button