नगर : निधी आणूनही कामे नाही; आमदारांनी झापले | पुढारी

नगर : निधी आणूनही कामे नाही; आमदारांनी झापले

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरात रस्ते, हॉस्पिटल, ड्रेनेज, पाणी योजना अशा विविध कामांसाठी शासनाकडून निधी आणला जातो मात्र, महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे वर्षांनुवर्षे कामे होत नाही. पाणी, कचर्‍याच्या समस्यांसाठी नागरिकांचे फोन मग अधिकारी काय करतात, असा सवाल उपस्थित करून आमदार संग्राम जगताप यांनी मनपा अधिकार्‍यांची खरडपट्टी केली.

वसंत टेकडी येथील पाण्याच्या टाकीची पाहणी केल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेवक समद खान, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक निखिल वारे आदी उपस्थित होते.

प्रभागातील पाणी, ड्रेनेज, कचरा याबाबतचे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी अधिकार्‍यांना विचारणा केली. त्यावेळी अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. तर, नगरसेवकांनी प्रभागात कचर्‍याचे ढीग आहेत. अनेक प्रभागात पाणी वेळेवर येत नाही, अशा तक्रारींचा केल्या. अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने आमदार संग्राम जगताप यांचा पारा चांगलाच चढला. ते म्हणाले, आज शहरात काही भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही.

नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर स्थानिक पातळीवर वॉलमन व संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतात. वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्यानंतर ते कानाडोळा करतात. मग कामे करायची कोणी असा सवाल आमदारांनी उपस्थित केला. शहरात विकास कामे करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणाला जातो. परंतु, ठेकेदार व मनपा अधिकार्‍यांत समन्वय नसल्याने ते काम वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींनी जनतेला काय उत्तरे द्यायची, अशा अनेक प्रश्नांची सरबती केली.

कामे वाटून देणे गरजेचे
महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त असताना एकाच अधिकार्‍यांकडे अनेक पदांचा पदभार कशासाठी. अन्य अधिकार्‍यांकडे महत्त्वाचा पदभार सोपवा. नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील. शहरात कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असा आरोपही पदाधिकार्‍यांनी केल्याचे समजते.

वाद बाजूला ठेवून कामे करा
नाट्य संकुलचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे ते केवळ अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याने. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये वाद असतील तर त्यात जनतेला का वेठीस धारता. निधी पडून असताना ठेकेदाराला बील कशामुळे दिले जात नाही, असे अनेक सवाल उपस्थिती करून अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह पदाधिकार्‍यांनी निर्माण केले.

Back to top button