राहुरी बसस्थानक कचर्‍याच्या विळख्यात, आठवड्यातून तीनदाच सफाई कर्मचार्‍यांची हजेरी | पुढारी

राहुरी बसस्थानक कचर्‍याच्या विळख्यात, आठवड्यातून तीनदाच सफाई कर्मचार्‍यांची हजेरी

राहुरी : रियाज देशमुख

नगर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच शिर्डी-शनिशिंगणापूर या जागतिक स्थळाला जोडणार्‍या राहुरीच्या बसस्थानकाला अस्वच्छतेने वेढले आहे. परिवहन विभागाकडून कायमस्वरूपी सफाई कामगारांची नेमणूक नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. बसस्थानकाला कायमस्वरूपी सफाई कामगार लाभावे, अशी मागणी होत आहे.

राहुरी बसस्थानकाच्या इमारतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. गेल्या दहा वर्षांपासून बसस्थानकाची इमारत व्हावी, अशी अपेक्षा राहुरीकरांना होती. दरम्यान, राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघाचे पालकत्व घेताच त्यांनी बसस्थानकाचा प्रश्न निकाली लावण्यात यश मिळविले. कोरोना कालखंडामुळे परिवहन महामंडळ अनंत अडचणींशी सामना करत असतानाच राहुरी बसस्थानकाला 17 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याचे सुखद वृत्त देण्यात आले. त्यापैकी 5 कोटी रुपये जमा झाले आहे.

दुप्पट परतावा करण्याच्या आमिषाने ५८ कोटींना चुना

बसस्थानक बांधकामाला वर्ष अखेरीपर्यंत प्रारंभ होईल, अशी माहिती मिळत आहे. निधी मिळाल्यानंतर परिवहन विभागाने बसस्थानकाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांनी बसस्थानक गर्दीने वेढले आहे. दरम्यान, प्रवाशांना मात्र बसस्थानकातील घाणीचे साम्राज्य सहन करावे लागत आहे.

बसस्थानकामध्ये स्वच्छता कर्मचारी अधून-मधून येत असल्याने परिसरात नेहमीच दुर्गंधी पसरत आहे. तसेच ठिकठिकाणी कचरा साचत असल्याने प्रवाशांना एकीकडे उन्हाचा उकाडा तर दुसरीकडे घाणीच्या विळख्यात एस.टी. गाड्यांची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बसस्थानकाच्या स्वच्छतेसाठी पूर्वी स्वच्छता कामगारांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली होती. संबंधित कामगार हे दिवसातून तीनदा बसस्थानक स्वच्छ करीत होते.

धक्कादायक! भांडुपमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाला ठार मारले, ४ जणांना अटक

परंतु, कोरोना व संप काळानंतर परिवहन महामंडळाने सफाई कामगारांना टेंडर दिले नाही. परिणामी एकाच सफाई कामगाराकडे तीन बसस्थानकांची स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली. संबंधित सफाई कामगार हा आठवड्यातून तीन दिवस बसस्थानकासाठी उपलब्ध असतो. उपलब्ध वेळेतच स्वच्छता होत असल्याने दिवसभर कचरा साचून राहतो.

बसस्थानकाची दुरवस्था असल्याने सांडपाणी व इतर ओला कचराही परिसरात साचतो. परिणामी बसस्थानक परिसरामध्ये घाणीच्या साम्राज्याने दुर्गंधी पसरलेली असते. राहुरी बसस्थानकाच्या अस्वच्छतेबाबत राहुरी नगरपरिषदेने काहीसा मदतीचा हात दिला आहे. राहुरी पालिकेचे सफाई कामगार आठवड्यातून दोनदा बसस्थानकामध्ये स्वच्छतेला मदत करतात. पालिकेचा बसस्थानकाला आधार लाभत असल्याची माहिती बसस्थानक अधिकारी यांनी दिली.

स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल : प्रदीप गलियत

राहुरी बसस्थानकातील अस्वच्छतेबाबत दोनदा परिवहन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. लवकरच कायमस्वरूपी स्वच्छता कामगार उपलब्ध होऊन बसस्थानकाच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल, असे मत वाहतूक नियंत्रक प्रदीप गलियत यांनी सांगितले.

बसस्थानकातून आजाराचा उपद्रव
राहुरी बसस्थानकामध्ये लोकल एस.टी. गाड्यांच्या फेर्‍या अजून सुरू झाले नसल्याने प्रवाशांना अधिक वेळ बसावे लागते. अशा परिस्थितीत बसस्थानकातील घाणीमुळे आजारांचा फैलाव होत आहे. एकीकडे कोरोनाच्या आजाराने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना बसस्थानकामध्ये आजाराची लागण होण्याची दाट शक्यता आहे, असल्याची प्रतिक्रिया प्रवाशी विनोद पवार यांनी दिली.

Back to top button