Nashik Crime News | सोळा लाखांच्या रोकडची बॅग लंपास, पेठ रोडवरील घटना | पुढारी

Nashik Crime News | सोळा लाखांच्या रोकडची बॅग लंपास, पेठ रोडवरील घटना

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
श्री राम नवमीनिमित्त संपुर्ण शहरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असतांना शहरामध्ये दुचाकी, चारचाकी चोरीच्या घटना घडत आहे. यातचं म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळील वजन काट्यालगत एका व्यापाऱ्याचे सोळा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस पुढील तपास करीत असून यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पवन मोहनलाल लोढा (वय ४२, रा. शिव समर्थ नगर, किशोर सुर्यवंशी मार्ग, पेठ रोड, म्हसरूळ ) हे आपल्या कुटुंबासह राहतात. लोढा यांचे शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात तेल, साखर, तूप याचा घाऊक व्यवसाय असुन त्यांचे आदिनाथ ट्रेडिंग कंपनी म्हणून दुकान आहे. दररोज प्रमाणे कामकाज उरकून दुकानातील हिशोबाची रक्कम घेऊन रात्री पाऊण आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान लोढा यांचे नातेवाईक दिलीप छाजेड (वय ६०) हे एक्टिवा या दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळील वजन काट्यालगत असतांना दुचाकीहून आलेल्या संशयितांनी छाजेड यांच्या एक्टिव्हा गाडीला आडवी गाडी उभी करून अचानक डोक्यात फटका मारला. त्यावेळी दिलीप छाजेड यांना झांज आली. त्याचाच फायदा उचलत संशयित यांनी त्यांचेकडील रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर घटनेचा अधिक तपास म्हसरूळ पोलिस करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button