भूमिगत हायड्रोलिक कचरापेटी योजना बारगळली!;बेळगावमध्ये शक्य तर मुंबईत…?

भूमिगत हायड्रोलिक कचरापेटी योजना बारगळली!;बेळगावमध्ये शक्य तर मुंबईत…?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव शहराच्या धर्तीवर मुंबई शहर व उपनगरात भूमिगत हायड्रोलिक कचरापेटी उभारण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. पण, या योजनेची फाईल पुढे सरकलीच नसल्याने आता ही योजना बारगळण्यात जमा झाल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर बेळगावसारख्या शहरात ही योजना यशस्वी होत असेल तर, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये का नाही, असा सवाल मुंबईकर करू लागले आहेत.

मुंबईत अनेक कचराकुंड्या उघड्यावर असल्यामुळे सभोवताली घाण व दुर्गंधी पसरत आहे. काही लोक कचरा प्लास्टिक पिशवीत बांधून लांबूनच कचरा पेटीत टाकून निघून जातात. उघड्यावर पसरलेल्या या कचर्‍यामुळे भटकी जनावरे, कुत्रे हा कचरा इतरत्र पसरवतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. यावर भूमिगत कचरापेटीचा पर्याय चार वर्षांपूर्वी निवडण्यात आला. महापालिकेने भूमिगत कचरापेटीची संकल्पना राबवलीही. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बेळगावच्या धर्तीवर शहरात भूमिगत हायड्रोलिक कचरापेटी ही योजना अमलात आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

भूमिगत हायड्रोलिक कचरापेटी हा भारतातील पहिला प्रयोग बेळगाव शहरात यशस्वी ठरला. त्यामुळे मुंबईतही असाच प्रयोग करावा, असा अशी भूमिका चार वर्षांपूर्वी नगरसेवकांनी मांडली होती. मात्र, नंतर या विषयाची फाईल पुढे सरकलीच नाही. त्यामुळे आता ही योजना आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूपच दुरावल्याचे बोलले जात आहे.

भूमिगत कचरापेटीची यंत्रणा

भूमिगत कचरापेटीची कचरा साठवण्याची क्षमता एक टन असून, कुंडी जमिनीखाली असल्याने वरच्या बाजूला केवळ कचरा टाकण्यासाठी झाकण असलेला डबा असतो. कचरा टाकल्यावर तो आजूबाजूला पसरत नाही व दुर्गंधीही येत नाही. भूमिगत कचरा पेटी 75 टक्के भरताच महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍याला मोबाईलवरून संदेश जातो. हा संदेश मिळताच कर्मचारी जाऊन त्या कचरापेटीतील कचरा उचलतात.

कचरापेटीत 90 टक्के कचरा साचल्यानंतरही तो कचरा उचलला गेला नाही तर तेथील स्थानिक नगरसेवक व महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मोबाईलवर संदेश जातो, अशीही व्यवस्था असते. कचरापेटी 100 टक्के भरूनही कचरा न उचलल्यास संबंधित कर्मचार्‍याला दंड ठोठावण्यात येतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news