Aamir Khan : ‘त्या’ दिवशी महाराष्ट्र बंद नसता, तर कदाचित मी स्टार झालो नसतो; आमिर खानचा चित्रपटात येण्याचा किस्सा | पुढारी

Aamir Khan : ‘त्या’ दिवशी महाराष्ट्र बंद नसता, तर कदाचित मी स्टार झालो नसतो; आमिर खानचा चित्रपटात येण्याचा किस्सा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खान हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. (Aamir Khan) आपल्या विलक्षण अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनात त्याने आणि त्याच्या चित्रपटांनी अढळ स्थान प्राप्त केले. अभिनयातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जगभरात त्याने नाव कमावले आहे. (Aamir Khan)

३६ वर्षांच्या त्याच्या धडाकेबाज सिनेमॅटिक प्रवासात, आमिर खानने निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता या नात्याने काही सुंदर कथा प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. अभिनेता आमिर खान याच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा प्रवासही मोठा रंजक आणि रोमांचक आहे.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या अलीकडेच पार पडलेल्या भागात, सुपरस्टार आमिर खानला या शोमध्ये सहभागी होण्याकरीता आमंत्रित करण्यात आले होते. या शोमध्ये पाहुणा म्हणून सहभागी होण्याची आमिरची ही पहिलीच वेळ होती आणि या ‘टॉक शो’ दरम्यान, त्याने आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवेशामागचे कारण हे ‘महाराष्ट्र बंद’ होते, असे सांगितले.

याविषयी सविस्तर माहिती देताना आमिर म्हणाला, “त्यावेळी मी करत असलेल्या नाटकाच्या तीन दिवस आधी ‘महाराष्ट्र बंद’ होता. त्या दिवशी मी रिहर्सलला जाऊ शकलो नाही. या कारणामुळे दिग्दर्शकाने मला नाटक सोडण्यास सांगितले. मला अश्रू अनावर झाले. कारण त्यांनी मला नाटकाच्या दोनच दिवस आधी नाटकातून काढून टाकले होते! मला इंटरकॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. तितक्यात दोन माणसे आली. त्यांनी मला पुणे इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा फिल्म ऑफर केली. मी लगेच बसमध्ये चढलो आणि शूटिंग पूर्ण केले. तिथे एडिटर म्हणून काम करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने तो चित्रपट पाहिला. माझ्या कामाने प्रभावित होऊन त्याने मला चित्रपटाची ऑफर दिली. ते दोन चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक केतन मेहता यांनी मला ‘होली’ (१९८४) मध्ये भूमिका दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

‘होली’ पाहिल्यानंतर मन्सूर आणि नसीर साहेब म्हणाले, ‘चला, याच्यासोबत चित्रपट करू.’ तिथेच त्यांना माझ्यासोबत चित्रपट बनवावा, ही कल्पना सुचली, कारण मी एक चांगला अभिनेता होतो आणि त्यातूनच ‘कयामत से कयामत तक’ घडला. त्यामुळे ‘त्या’ दिवशी महाराष्ट्र बंद नसता, तर कदाचित मी स्टार झालो नसतो.

आमिरने सांगितलेली ही कथा ऐकण्यास रंजक नक्कीच आहे. परंतु त्यातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यापूर्वी आमिर खानने जीव तोडून केलेली मेहनत आणि संघर्ष हादेखील दिसून येतो. भारतीय चित्रपटसृष्टीत आमिरने अभूतपूर्व कामगिरी बजावत, मनोरंजन क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे आणि त्याचबरोबर समाजाकरताही तो मोठे योगदान देत आहे.

दरम्यान, आमिर खानने त्याच्या ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’ अंतर्गत, किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा अप्रतिम चित्रपट अलीकडेच सिनेरसिकांसमोर पेश केला आहे. आमिर सध्या यंदाच्या नाताळच्या सुट्टीत प्रदर्शित होण्याच्या तयारीत असलेल्या ‘सितारे जमीं पर’ चे शूटिंग करण्यात बिझी आहे.

Back to top button