कोल्हापूर : जि. प. लेखाधिकार्‍याचे अपहरण करून मारहाण | पुढारी

कोल्हापूर : जि. प. लेखाधिकार्‍याचे अपहरण करून मारहाण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी आणि सध्या निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेले दीपक बाळासाहेब माने (वय 44, रा. ई वॉर्ड, रॉयल इनफिल्ड अपार्टमेंट, नागाळा पार्क) यांचे जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी आणि महिला कर्मचार्‍याच्या पतीसह आठजणांनी निवडणूक कार्यालयातूनच चारचाकीतून अपहरण करून बेदम मारहाण केली. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी रात्री राजारामपुरी पोलिसांत आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्वयंपाक मदतनिसांच्या मानधन देयकावरून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी इंद्रजित मारुती साठे (38, रा. विनोद चौगुलेनगर, कळंबा), संग्राम दिनकर जाधव (42, शुक्रवार पेठ), उत्तम आनंदा भोसले (30, रा. पाटपन्हाळा, ता. राधानगरी), प्रकाश मेहपती मिसाळ (32, रा. मिसाळवाडी, ता. राधानगरी), संदीप मधुकर ठमके (40, रा. 2501 डी वॉर्ड, जुना बुधवार पेठ), महादेव कृष्णा मेथे (46, रा. प्लॉट नं. 30, रामानंदनगर), मंगेश तुकाराम जाधव (42, रा. कुंभार गल्ली) आणि प्रसाद संजय आमले (31, बागल चौक) यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयता व अपहरणासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन जप्त केले आहे.

माने कमला महाविद्यालयात सुरू केलेल्या निवडणूक कक्षात बुधवारी सकाळी कामकाज करत होते. साडेअकराच्या सुमारास माने यांच्या कार्यालयात काम करणार्‍या एका महिला कर्मचार्‍याचा पती इंद्रजित साठे व जिल्हा परिषदेत माने यांच्यासोबत काम करणारा संदीप ठमके आपल्या अन्य सहा सहकार्‍यांसह कमला महाविद्यालयात आले. साठे याने मानधन निधीवाटप अपहाराबाबत चर्चा करायची आहे, असे सांगत माने यांना कार्यालयाबाहेर बोलावले. माने बाहेर येताच सर्वांनी त्यांच्यावर झडप घालून (एम.एच. 10 एएन 7252) या गाडीतून त्यांचे अपहरण केले. त्यांना टेंबलाई मंदिर परिसरात नेऊन मारहाण करण्यात आली. स्वयंपाक मदतनीस निधीच्या 23 लाख रुपये रकमेचा अपहार तुम्हीच केला आहे, असे कबूल करा. आम्हाला 10 लाख रुपये द्या; अन्यथा विनयभंगाची तक्रार देऊ, अशी धमकी दिली. सुटका झाल्यानंतर माने यांनी पोलिसांत धाव घेतली.

Back to top button