Nashik News : विधी संघर्षित मुलाने साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्यात फेकले, नाका-तोंडात पाणी गेल्याने मृत्यू | पुढारी

Nashik News : विधी संघर्षित मुलाने साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्यात फेकले, नाका-तोंडात पाणी गेल्याने मृत्यू

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा– शहरातील दातारनगर भागातील हलवई मशिदीजवळील कारखान्यामागे साचलेल्या सांडपाण्यात विधिसंघर्षित तेरा वर्षीय मुलाने त्याच्यासमवेत खेळणार्‍या हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन या साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्याच्या नाल्यात फेकल्याची घटना बुधवारी (दि. 6) दुपारी घडली. बालकाच्या नाका-तोंडात सांडपाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात विधिसंघर्षित मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दातारनगर भागात राहणारे चार लहान मुले विधीसंघर्षीत तेरा वर्षीय मुलाबरोबर खेळत होती. खेळत असताना ही मुले सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली. काहीवेळा येथे ही बालके घुटमळली. यानंतर संशयित तेरा वर्षीय टोपी घातलेल्या मुलाने हस्सान मलीक मुदस्सीर हुसेन (रा. दातारनगर, रमजानपुरा) याला उचलून सांडपाण्याच्या डबक्यात फेकून दिले. यानंतर सदर मुलगा पळून गेला. यादरम्यान एक लहान मुलाने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा पाय फसल्याने तो पुन्हा काठावर आला. याच कालावधीत सांडपाण्यात बुडून या चिमुकल्याचा मृत्यू झाला. याची वाच्चता होताच बालकाच्या कुटुंबियांनी माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरुन सांडपाण्याच्या डबक्याजवळ, कारखान्यात व अन्यत्र सीसीटीव्ही आहे का याची चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी कारखान्याचा सीसीटीव्ही तपासला असता ही घटना निदर्शनास आली. पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मयत बालकाचा मृतदेह पाण्यातून काढत पंचनामा केला. सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात कब्रस्थान येथे दफनविधी करण्यात आला. या घटनेसंदर्भात पवारवाडी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व उर्वरित बालकांकडून माहिती घेऊन तपास करीत आहेत. या घटनेचा सहायक पोलीस निरिक्षक पवार तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button