चिचोंडी पाटील : नगर-जामखेड रस्त्याचे काम एक वर्षापासून संथगतीने सुरू आहे. त्यास ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून, त्याचा मोठा आर्थिख फटका नगर तालुक्यातील व्यावसायिकांनाबसत आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, आठवड गावानंतर मराठवाड्याची हद्द सुरू होते. त्यामुळे या गावाला मराठवाड्याचे प्रवेशद्वार संबोधले जाते. त्यात नगर-जामखेड रस्ता नगर व बीड या दोन्ही जिल्ह्यांतील प्रमुख दुवा असून, या रस्त्याने जामखेड पासून अनेक नागरिक, व्यापारी, नोकरदार, शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी नगर शहरात येत असतात. पर्यायाने या मार्गावर अनेक व्यवसाय उभारण्यात आले. ते चांगल्या प्रकारे चालत होते. परंतु एक वर्षापासून या रस्त्याच्या कामास सुरूवात झाली, अन् तेथूनच खर्या अर्थाने नगर तालुक्यासह पुढे आष्टी तालुक्यातील अनेक व्यावसायांना उतरती कळा लागली.
सन 2017 मध्ये नगर ते बीड राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. सन 2019 मध्ये नगर ते साबलखेड दरम्यानचा रस्ता डांबरी करण्यात आला. त्यानंतर साबलखेड ते आष्टी हा राष्ट्रीय महामार्ग 17 किलोमीटरचा तसाच राहिला. 2022 मध्ये या रस्त्याच्या कामाची 220 कोटी रुपयांची निविदा निघाली. 3 एप्रिल 2023 रोजी कामाला सुरूवात आली. संबंधित ठेकेदाराने सलग काम न करता अनेक ठिकाणी कामाचे तुकडे-तुकडे केले. त्यामुळे एकीकडे या रस्ताकामामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे, तर अनेक ठिकाणी रस्ता फक्त उकरून ठेवल्याने धुळीचे लोट प्रवाशांच्या डोळ्यांत जात आहेत.
त्यामुळे जामखेड, आष्टी, कडा आदी भागांतून थेट नगरला येणारे नागरिक कडा परिसरातून मिरजगाव व सोलापूर रस्त्याने नगर असा वळसा घालून जातात. त्यामुळे या रस्त्यावरून आजमितीला बोटावर मोजण्याइतकीच वाहने धावतात. याचा थेट परिणाम व्यावसायिकांवर होत आहे. त्यांच्यासमोर आर्थिक समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांनी कडा, आष्टी, नगर, पुणे, मुंबई, शिर्डी, शिंगणापूर, किंवा बीडकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर सुरू केला आहे.
ग्राहक नसल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. हॉटेल व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार 20 टक्केही व्यवसाय होत नाही. त्यामुळे अनेकजण व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहेत.
शासकीय नोकर्या नसलेले तरुण व्यवसायाकडे वळाले आहेत. शासनाचे योजनेचा फायदा घेऊन त्यांनी व्यवसाय उभारले आहेत. परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अनेक व्यावसायिक तरुणावर आर्थिक संकटात सापडले आहेत.
हेही वाचा