New Baby : 9 हजार 661 बालकांना मिळाले नवजीवन; रायगडची रुग्णालये होतायेत स्मार्ट | पुढारी

New Baby : 9 हजार 661 बालकांना मिळाले नवजीवन; रायगडची रुग्णालये होतायेत स्मार्ट

अलिबाग: अमुलकुमार जैन :  अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात नवजात बालकांसाठी अती दक्षता कक्ष स्थापन करण्यात आले. त्याला अकरा वर्षे होत आली आहेत. आतापर्यंत नवजात बालकांसाठी अती दक्षता कक्ष माध्यमातून नऊ हजार 621 नवजात बालकांवर उपचार करून बालकांना नवजीवन देण्यात आले आहे. ( New Baby )

संबंधित बातम्या 

एनआयसीयु याचा अर्थ नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (न्यूबॉर्न इंटेंसिव्ह केअर युनिट) असा आहे. आजारी किंवा मुदतपूर्व जन्माला आलेल्या नवजात बालकांसाठी 24 तास वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या रुग्णालयासाठी हा विभाग म्हणजे वैद्यकीय सुविधेची पहिली पायरी म्हणावी लागेल.

एनआयसीयूचे 3 प्रकार असतात. त्यात इंटेंसिव्ह केअर एनआयसीयू, मॉडरेट लेव्हल एनआयसीयू आणि बेसिक ट्रीटमेंट एनआयसीयू यांचा समावेश आहे. भारतात सुमारे 15 टक्के बालके ही मुदतपूर्व जन्माला येतात. म्हणजेच पूर्ण 40 आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच ही बालके जन्माला येत असून त्यांना लेव्हल 3 एनआयसीयू विभागात ठेवले जाते. तसेच सुमारे तीन हजारच्या आसपास कमी दिवसांची बालके बरी होऊन आपापल्या घरी गेली आहेत.

रुग्णालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत अत्याधुनिक नवजात बालकांसाठी नवीन कक्ष 17 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यान्वित करण्यात आला होता. या कक्षात बारा बालकांसाठी वार्मर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षात बालरोग तज्ज्ञ सागर खेदू यांच्यासहित पंचवीस अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या ठिकाणी नवजात बालकांना गुणवत्तापूर्वक सेवा देण्याचे काम आजतागायत सुरू आहे. नवजात बालकांमध्ये होणारे आजार जसे कमी दिवसांच्या कालावधीत जन्माला आलेले बाळ, कावीळ, जन्मतः श्वासघेण्यास त्रास होणे, मातेच्या पोटात शी गिळणे, जन्मतः वंग असणे, आकडी येणे अशा विविध स्वरूपाच्या आजारांवर उपचार केले जातात.

येथे दर आठवड्याला नवजात बालकांची आरओपी (डोळ्यांची) तपासणी, कानाची बेरा व ओएई तपासणी करण्यात येते, तसेच रक्तदोष आढल्यास योग्य उपचार देण्यात येतात. पुढील संभाव्य धोके टाळण्यास मदत होते. जन्मजात व्यंग याचे देखील निदान करून डीईआयसीमार्फत पुढील सेवा व उपचार केले जातात. आजपर्यंत याचा फायदा अनेक नवजात बालकांना झाला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली आहे. या ठिकाणी सर्व तालुक्यामधून नवजात बालके उपचाराकरिता येथे येत असतात.

श्रीवर्धन, माणगाव, कर्जत, रोहा, महाड या ठिकाणी नव्याने नवजात बालक कक्ष स्थापन करण्याकरिता शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पैकी महाडसाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तेथील रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार मिळण्यास मदत होणार आहे. ज्या बाळांचे जन्मतः वजन 2.5 किलो पेक्षा कमी किंवा अगदी 1.8 किलोपेक्षा कमी वजन असणार्‍या बालकांना लेव्हल 3 एनआयसीयू विभागात ठेवले जाते. ( New Baby )

भारतात जन्माला येणार्‍या प्रत्येक 100 बालकांपैकी 10 टक्के बालकांना एनआयसीयूची गरज भासत असून त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असले पाहिजे. बाळ जितके लहान असते तितके जास्त दिवस त्याला एनआयसीयूची गरज असते. रज्या मुदतपूर्व बालकांचे वजन सुमारे दीड किलो, 1200 ग्रॅम किंवा 1 किलोच्या आसपास असल्यास त्यांना 1 ते दीड महिना एनआयसीयूची गरज लागू शकते. बाळाचे वजन जितके कमी तितका जास्त वेळ बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवावे लागते. पाचशे ते सातशे ग्रॅम वजनाच्या बालकांचे जगण्याचे प्रमाण हे चाळीस ते ऐशी टक्के आहे. तर 700 ग्रॅम ते एक किलो वजनाच्या बालकांचे जगण्याचे प्रमाण 70 ते80 टक्के आहे.

आधुनिक काळातील वैद्यकीय सेवेच्या प्रगतीमुळे अशा बालकांच्या वाचण्याचे प्रमाण वाढत आहे, ही समाधानकारक बाब आहे. 1 किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या बालकांना सर्व आधुनिक सुविधा असलेल्या एनआयसीयूमध्ये दाखल केल्यास ती वाचण्याची शक्यता 75 ते 85 टक्के असते. ( New Baby )

नवजात बालकांसाठी दुसरी सर्वसामान्य समस्या म्हणजे श्वास घेताना होणारा त्रास, त्यासाठी एनआयसीयूची मदत घेतली जाते. भारतात जन्माला आलेल्या 100 पैकी 10 बालके जन्मल्यानंतर रडत नाहीत. बालकांसाठी तिसरी सर्वसामान्य समस्या म्हणजे संसर्ग. नवजात बालकांना एनआयसीयूची गरज असल्याचे चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे कावीळ. कावीळग्रस्त बालकांना एनआयसीयू उपचारांसाठी 10 दिवस ते 3 आठवडे लागू शकतात. एनआयसीयूमध्ये दाखल असलेल्या बालकांना बरे होण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सुविधा असलेल्या वैद्यकीय सेवेनंतरही बरे होण्यासाठी काही काळ लागतोच. अद्ययावत तंत्रज्ञान आणि ज्ञानामुळे जगण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा बालकांसाठी एनआयसीयुचे महत्त्व देखील वाढले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे, यांच्या मार्गदर्शना खाली या कक्षाचे कामकाज सुरु आहे. ( New Baby )

अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या बालकांची आकडेवारी

वर्ष दाखल/बालकांची संख्या
2013-14/240
2014-15/862
2015-16/910
2016-17/1061
2017-18/1091
2018-19/873
2019-20/861
2020-21/890
2021-22/854
2022-23/1110
2023-24/869

Back to top button