Sanjay Raut : रोहित पवारांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत | पुढारी

Sanjay Raut : रोहित पवारांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिली नसून, ती भाजपची शाखा बनल्याची टीका शिवसेने (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हुकूमशाहीविरोधात आणि लोकशाही वाचविण्यासाठी जे आवाज उठवतात, त्यांना भाजप ‘ईडी’च्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते, असा आरोप करताना रोहित पवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Sanjay Raut)

ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.२४) खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली असून, ते बुधवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यासंदर्भात राऊत यांना विचारले असता त्यांनी ईडीसह भाजपला खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र राहिली नसून, ती भाजपची शाखा बनली आहे. एकीकडे प्रभू श्रीरामाची पूजा करायची आणि दुसरीकडे विरोधी पक्षांचा आवाज दाबायचा असा प्रकार सध्या सुरू आहे. महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी उभी आहे. आमची लोकशाहीची लढाई आहे. ती कायम सुरू राहील, असेही राऊत यांनी सांगितले. जे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत, त्यांना आणि त्यांच्या नातेवाइकांना शासकीय यंत्रणांना हाताशी धरून त्रास दिला जात आहे. मी त्या त्रासातून गेलो आहे, अजूनही तो त्रास सुरू आहे. अजित पवार यांना आणि कुटुंबाला ईडीने त्रास दिला. ते आज भाजपच्या छत्रछायेखाली आहेत. त्यामुळे त्यांना शांत झोप लागते. हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने त्रास दिला. ते ही भाजपात गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा ईडीग्रस्त आहेत. ईडीला घाबरूनच ते तिकडे गेले, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले.

आम्ही दादा भुसे यांच्या घोटाळ्यांची यादी दिली, पण ईडीने काहीच कारवाई केली नाही. परंतु, ईडी भाजपची शाखा असल्याप्रमाणे किशोरी पेडणेकर, सूरज चव्हाण, रवींद्र वायकर यांना त्रास देत आहे. जे भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढता त्यांना आत टाकले जाते, अशा शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला.

हेही वाचा :

 

Back to top button