धुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला खिंडार, सरपंच बाळासाहेब भदाणे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

धुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला खिंडार, सरपंच बाळासाहेब भदाणे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

धुळे ; पुढारी वृत्तसेवा- धुळे तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माध्यमातून राजकारण करणारे बाळासाहेब भदाणे यांनी अखेर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला मदतीची भूमिका घेतली होती. त्यामुळे ते भाजपामध्ये जातील असा अंदाज होता. अखेर आज त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेऊन चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले असून त्यांच्या विकास कामांच्या पाठीशी भाजप उभे राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब रावण भदाणे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबईस्थित भाजपा प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, मंत्री ना.गिरीश महाजन, खा.डाॅ.सुभाष भामरे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, महामंत्री विजय चौधरी, आ.प्रसाद लाड, आ.मंगेश चव्हाण यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

या भाजपा प्रवेश सोहळ्यात बाळासाहेब भदाणे यांच्या सोबत, माजी जि.प.सदस्य प्रभाकर बुधा पाटील, बापजी ग्रुप आदिवासी संघटनेचे राज्याध्यक्ष भरत आप्पा जाधव, धुळे तालुका काॅग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशोक सुडके यांच्यासह २ माजी जि.प.सदस्य, २ विद्यमान पं.स.सदस्य व माजी पं.स.सदस्य आदी प्रमुख पदाधिकारींनी भाजपा प्रवेश केला. तसेच यावेळी धुळे ग्रामीणमधील ६१ ग्रा.पं.चे विद्यमान सरपंच, १७ उपसरपंच, चारशेंवर ग्रा.पं.चे विद्यमान पदाधिकारी तसेच १८ माजी सरपंच, सोसायटींचे चेअरमन व असंख्य पदाधिकारी आदींसह प्रतिष्ठीत नागरिकांनी भाजपात प्रवेश केल्याचा दावा भदाणे गटाने केला आहे. धुळे ग्रामीणमधील शेकडो निवडक पदाधिकार्‍यांसह हा प्रवेश झाला असून, लवकरच धुळे ग्रामीणमध्ये भव्य सहविचार स्नेह मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी पुढे बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब भदाणे यांना शुभेच्छा देऊन पक्षात स्वागत केले. ना.गिरीष महाजन यांनी भदाणे यांनी जोमात कामास लागण्याचे निर्देश दिले. धुळे ग्रामीणमध्ये वर्षानुवर्ष विकासाचा नावाने वानवा आहे. सामान्य व्यक्तीस केंद्रस्थानी ठेऊन, भाजपाच्या माध्यमातून धुळे ग्रामीणमधील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील अशी पहिली प्रतिक्रिया यावेळी बाळासाहेब भदाणे यांनी दिली. राजकारणाची परिभाषा बदलल्याचे आश्वासक चित्र, आगामी काळात धुळे ग्रामीणमधील जनतेला पाहायला मिळेल असा विश्वासही भदाणे यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाकरे गटाला खिंडार

धुळे तालुक्यातील बोरकुंड परिसरात बाळासाहेब भदाणे यांचे मोठ्या प्रमाणावर वर्चस्व असून त्यांची पत्नी देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सदस्य पदी निवडून आल्या आहेत. तसेच अन्य दोन सदस्य देखील भदाणे यांचे समर्थक असल्याचे मानले जाते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये भदाणे यांनी प्रवेश घेतल्याने हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो आहे.

गेल्या काही वर्षांपासून या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या धोरणांच्या विरोधात निर्णय घेतले. त्यामुळे ठाकरे गटाच्यावतीने त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. या सर्व घटना पाहता भदाणे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अखेर आज त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button