आई – वडिलांचा सांभाळ करायचा नाही तर महिन्याला पैसे द्या ; प्रांताधिकार्‍यांचा आदेश | पुढारी

आई - वडिलांचा सांभाळ करायचा नाही तर महिन्याला पैसे द्या ; प्रांताधिकार्‍यांचा आदेश

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या पाच वारसांनी त्यांना दरमहा प्रत्येकी दोन हजार रूपये द्यावेत, असा आदेश प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिला आहे. या निकालाचे सर्वत्र स्वागत होत असून, आई-वडिलांना वाळीत टाकणार्‍या मुलांना ही एक प्रकारे जोरदार चपराक म्हणावी लागेल. या निकालामुळे ज्या कुटुंबातील मुले आपल्या माता -पित्याचा सांभाळ करीत नाहीत, अशा मुलांविरोधात शासन दरबारी दाद मागता येते, हे अधोरेखित झाले आहे. पाथर्डी प्रांत कार्यालयात जिल्ह्यात राहणार्‍या एका सधन कुटुंबातील वयोवृद्ध आई-वडिलांनी तक्रार दाखल केली होती.

त्यांना चार मुली व एक मुलगा आहे. हे सर्व आमचा सांभाळ करीत नसून, आम्ही आपल्या सर्व अपत्यांचे शिक्षण करून त्यांचे लग्न लावून देत त्यांना पायावर उभे करून दिले. आता आम्ही वयोवृद्ध झालो आहोत. मात्र, ही मुले आमचा सांभाळ करीत नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारींवर सुनावणी चालू असताना त्यांच्या दोन मुलींनी मात्र आई-वडिलांच्या विरोधी भूमिका न घेता, प्रांताधिकारी जे आदेश देतील ते आम्हास मान्य असून, आम्ही आमच्या आई-वडिलांचा सांभाळ करू, अशी भूमिका घेतली. तर, इतर तीन अपत्यांनी मात्र आई- वडिलांच्या विरोधी भूमिका घेत, त्यांना आर्थिक मदत करण्यास नकार दिला. प्रांताधिकारी मते यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चार मुली व मुलास दरमहा प्रत्येकी दोन हजार रूपये आई-वडिलांना देण्याचा आदेश दिला.

हेही वाचा :

Back to top button