Pune News : उत्पादन शुल्कचा पुणे विभाग महसुलात अव्वल | पुढारी

Pune News : उत्पादन शुल्कचा पुणे विभाग महसुलात अव्वल

पुणे : राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने महसुलासह देशी मद्य विक्री, भारतीय बनावटीची विदेशी मद्य विक्री, यासह बिअर आणि गुन्हा अन्वेषणची कारवाई बरोबरच परराज्यांतील मद्याची आयात व विक्री केलेल्या कारवाईत राज्यातील ३६ जिल्ह्यांत सर्वांत अधिक कामगिरी करीत ‘अव्वलस्थान’ पटकाविले. विशेष म्हणजे विभागाने सर्वच विभागाच्या कामगिरीत दहापैक्री दहा गुण प्राप्त केले आहेत.

राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभाग दस्तनोंदणी, भूमीअभिलेख आदींतून महसूल शासनास मिळवून देत असतो. दरवर्षी वीस हजार कोटींहून अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत या विभागाकडून जमा होत असतो. या महसुलात पुणे शहरासह जिल्ह्यातून राज्यातील ३६ जिल्ह्यापेक्षा जास्त महसूल जमा होत असतो. याचाच आढावा प्रत्येक वर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्या उपस्थितीत घेण्यात येत असतो. या विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मुंबई राज्यातील ३६ जिल्ह्यांचे अधीक्षक यांची आढावा बैठकपार पडली.

या बैठकीत सर्वच जिल्ह्यांच्या उत्पादन शुल्क विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये महसूल, देशी मद्य विक्री, भारतीय बनावटीची विदेशी मद्य विक्री (आयएमएफएल), बिअर तसेच गुन्हा अन्वेषणची कारवाई (अवैध मद्य विक्री, निर्मिती, वाहतूक, विक्री तसेच परराज्यांतील मद्याची अवैध आयात, वाहतूक याचा समावेश आहे) या आढाव्यात प्रत्येक जिल्ह्याच्या कामगिरीबाबत गुणांकन करण्यात आले. प्रत्येक कामगिरीस दहा गुण देण्यात आले होते.

या सर्वच कामगिरीत उत्पादन शुल्कच्या पुणे जिल्ह्याची कामगिरी राज्यात अव्वल ठरली आहे. दरम्यान, महसुलात जळगाव दुस-या स्थानी, तर कोल्हापूर, रायगड, संभाजीनगर, नांदेड, नाशिक हे जिल्हे अनुक्रमे तीन ते आठव्या स्थानी आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे जिल्ह्याने महसूल, मद्य विक्री आणि गुन्हा अन्वेषण या तीन विभागात अव्वल कामगिरी केली आहे. याबाबत सूर्यवंशी यांनी राज्य उत्पादन शुल्कचे पुणे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा

Back to top button