Nashik MD Drug Case : कारखान्यात दिवस-रात्र सुरू होते एमडी उत्पादन, फरार पाच कामगारांचा शोध सुरू | पुढारी

Nashik MD Drug Case : कारखान्यात दिवस-रात्र सुरू होते एमडी उत्पादन, फरार पाच कामगारांचा शोध सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, मुंबईतील साकीनाका पोलिसांनी नाशिकच्या शिंदे गावातील कारखान्यात धाड टाकून १३३ किलो एमडी (मॅफेड्रॉन) जप्त केले. तसेच या प्रकरणी संशयित जिशान इक्बला शेख (३४, रा. नाशिकरोड) यालाही अटक केली आहे. जिशानने पोलिस तपासात दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यात दिवस-रात्र कायम एमडीचे उत्पादन सुरू होते. त्यासाठी पाच कामगार काम करीत होते. हे पाचही कामगार फरार झाल्याने मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. (Nashik MD Drug Case)

संबधित बातम्या :

गुरुवारी (दि. ५) रात्री साकीनाका पोलिसांनी शिंदे गावातील कारखान्यावर कारवाई केली. यात पोलिसांनी १३३ किलो एमडीचा साठा व एमडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. तसेच जिशान शेखला अटक केली. जिशानला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिस तपासात जिशानने अनेक धक्कादायक खुलासे केले. शिंदे गावातील कारखाना हा एमडी ड्रग्जच्या प्रकरणात पुणे येथून फरार असलेल्या ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील चालवित होता. त्यामुळे साकीनाका पोलिसांनी भूषणचाही शोध सुरू केला आहे. पोलिस तपासात भूषणचा २३ ऑगस्टपासून थांगपत्ता लागत नसल्याने तो तेव्हापासूनच फरार असल्याचे समाेर येत आहे.(Nashik MD Drug Case)

दरम्यान, नाशिकमध्ये तयार होणारे ड्रग्ज कोणाच्या माध्यमातून कुठे वितरीत व्हायचे, याबाबतही साकीनाका पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांकडून ऑगस्ट महिन्यापासून एमडीसंदर्भातील गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी 12 संशयितांना अटक करून 300 कोटी रुपयांचे १५१ किलो एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे. (Nashik MD Drug Case)

मागावर राहून कारवाई

एमडी ड्रग्जमधील साखळी शोधण्यासाठी साकीनाका पोलिस आठ ते दहा दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते. शिंदे गावात निर्मनुष्य ठिकाणी जिशान काम करीत असलेला कारखाना पोलिसांनी शोधला होता. संशयित जिशानला पकडून त्याची कसून चौकशी करून अटक केली. त्यानंतर कारखान्यात धाड टाकून ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. तसेच जिशानकडील चौकशीतून अनेक खुलासे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button