लवंगी मिरची : होऊ दे चर्चा…!

लवंगी मिरची : होऊ दे चर्चा…!
Published on
Updated on

संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही फिरलात तर तुम्हाला एकच द़ृश्य दिसेल आणि ते म्हणजे चर्चा करत असलेले लोक. नाक्यावर, पारावर, चावडीवर, टपर्‍यांवर, हॉटेलमध्ये लोक चर्चा करत असतात. मी काय म्हणतो मित्रा, ती आधीच एवढी चर्चा सुरू असताना 'पुन्हा होऊ दे चर्चा' कशाला पाहिजे?

अरे 'होऊ दे चर्चा' म्हणजे लोक ज्या गप्पा मारतात की नाही, त्या बरेचदा वायफळ गप्पा असतात. 'होऊ दे चर्चा' म्हणजे मला पाहिजे असलेली चर्चा तुम्ही करा. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काही पक्षांनी 'चायपे चर्चा', 'नाश्तेपे चर्चा', 'खानेपे चर्चा' आयोजित केल्या होत्या पण कुणी रात्रीच्या वेळी टेबलवर चर्चा वगैरे आयोजित केल्याचे ऐकिवात नाही. अर्थात हे मतदारांचे नशीबच म्हणावे लागेल, पण महाराष्ट्र हा भरपूर चर्चा करणार्‍या लोकांचा प्रांत आहे हे मात्र नक्की. अगदी ग्रामीण भागात तू जर एखाद्या गावात गेलास तर गावाबाहेर छोटेसे टपरीवजा हॉटेल असते. तेथील रिकाम्या बाकड्यांवर बसून लोक भरपूर चर्चा करत असतात. ही चर्चा स्थानिक राजकारण, ग्रामपंचायत राजकारण, जिल्हा परिषदेचे राजकारण, आमदारकीचे आणि खासदारकीचे राजकारण एवढ्यावरच थांबत नाही तर थेट देशपातळीवरच्या राजकारणावर पण चर्चा होत असते. चर्चा करण्याला कुणाची बंदी नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चर्चा करण्याचे स्वातंत्र्य.

होय,नक्कीच. मी परवा गावाकडे गेलो होतो तेव्हा देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी काय केले पाहिजे यावर गावात चर्चा चालू होती. अर्थमंत्री आणि पंतप्रधान यांनाही सल्ला देण्याच्या ताकतीचे काही लोक गावात असतात आणि ते आपला मुद्दा पद्धतशीरपणे मांडत असतात. त्यामुळे मला असे वाटते की वेगळी होऊ दे चर्चा कार्यक्रम करण्याची फारशी काही गरज नाही. परवा आमच्या कॉलनीमध्ये राहणारे काका, जे स्वतःचे घर रात्री साडेआठ वाजता कड्या कुलुपे लावून बंद करतात तेही इजराइल आणि पॅलेस्टाईन प्रश्नावर चर्चा करत होते. म्हणजे कितीतरी वर्षे भिजत पडलेल्या या प्रश्नावर तोडगा काढता काढता जगभरातील राजनैतिक मुत्सद्दी थकून गेले पण हा प्रश्न सोडवण्याचे एक जालीम उपाय काकांकडे आहे. आता काकांचे दुर्दैव असे आहे की आम्ही चार रिकामी टाळकी त्यांचे मनोभावे ऐकतो म्हणून त्यांना स्फुरण चढते. या विषयावर आमच्या कॉलनीत चर्चा करून काय उपयोग आहे? काकांना खरं तर युनोने बोलवायला पाहिजे आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही पक्षांना समोर बसवून काकांचा तोडगा ऐकून त्यावर चर्चा केली पाहिजे तर काहीतरी मार्ग निघू शकतो.

म्हणजे महत्त्वाचे काय आहे तर कुठे ना कुठेतरी चर्चा होत राहिली पाहिजे. राजकारण हा मराठी जनतेच्या फार जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे येणार्‍या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा चांगला जोर धरू लागली आहे. 'आयेगा तो मोदी ही' असे जोरदार प्रतिपादन करणारे आणि त्यांना विरोध करताना मोदींचे नेमके काय चुकले हे सांगणारे असे दोन्ही पक्ष या राज्यात असतात आणि विशेष म्हणजे चर्चेत सहभाग घेणार्‍या प्रत्येकाला आपलेच म्हणणे खरे आहे असे वाटत असते. होय मित्रा, तू म्हणतोस ते बरोबर आहे. ही चर्चा जर मुद्देसूद असेल तर फार चांगले, नाही तर ही चर्चा बरेचदा मुद्द्यावरून गुद्द्यावर येते आणि शारीरिक संघर्षाला सुरुवात होते हेही आपल्या राज्यात नेहमी घडताना आपण पाहिले आहे. चल, तूर्तास आपली चर्चा बंद करू आणि आपापल्या घरी जाऊ. येतो मी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news