३४ जिल्ह्यांत सुपर स्पेशालिटी रुग्णालये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

३४ जिल्ह्यांत सुपर स्पेशालिटी रुग्णालये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या दुरवस्थेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई वगळता सर्व 34 जिल्ह्यांत सुसज्ज सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदेही तातडीने भरली जाणार आहेत. सर्व रुग्णालयांत तातडीने गरजेनुसार औषधे खरेदी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. येत्या पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या जोडीने राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांनी युक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी सोमवारी दिले.

वर्ष 2035 पर्यंत आरोग्य यंत्रणा सुधारताना वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी एक आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे निर्देशही दिले. राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत सोमवारी मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृती दलाचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.

औषधे, उपकरणे तत्काळ खरेदी करावेत

जिल्हाधिकार्‍यांना जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांनी वेळ न गमावता आपापल्या जिल्ह्यांतील औषध खरेदी, वैद्यकीय उपकरण खरेदी दरपत्रकानुसार तत्काळ करून घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. जीवरक्षक, अत्यावश्यक औषधांची खरेदी वेगळे दरपत्रक मागवून करावी, असेही ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही जिल्ह्यातून रुग्णालयांमधून औषधे नाहीत अशी तक्रार येणार नाही हे कटाक्षाने पाहावे, असे ते म्हणाले.

पद भरतीला वेग द्या

सध्या सार्वजनिक आरोग्य विभागात 19 हजार 695 पदे रिक्त असून ती भरण्याची कार्यवाही टीसीएसमार्फत सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील हे पाहावे अशी सूचनाही त्यांनी केली. 38 हजार 151 पदे यापूर्वीच भरण्यात आली आहेत, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.

9 परिमंडळांची निर्मिती

राज्यात आरोग्य विभागाची 8 सर्कल्स आहेत. रुग्णांचा ताण लक्षात घेता आणखी नवी 9 परिमंडळ निर्माण करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ग्रामीण आणि दुर्गम भागात टेलीमेडीसीनचा उपयोग वाढविण्याची सुचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी आवश्यक असेल तिथे तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news