Mahadev Jankar : महादेव जानकर ‘बारामती लोकसभा’ लढविणार | पुढारी

Mahadev Jankar : महादेव जानकर 'बारामती लोकसभा' लढविणार

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा लढविण्याचे संकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी दिले. पक्षाची जनस्वराज यात्रा सोमवारी (दि २८) रात्री बारामती शहरात पोहचली.यावेळी जानकर यांचे ‘रासप’चे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे ,तालुकाध्यक्ष अँड अमोल सातकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांची राजकीय भूमिका मांडली.

जानकर म्हणाले , देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये मी भेद करत नाही. काँग्रेस सत्तेत असतानाही त्यांनी मित्र पक्षांचे असेच हाल केले. भाजपही सत्तेत असल्यावर असंच करणार. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसवर नाराज न राहता आपली ताकद वाढवली पाहिजे. मोठा मासा छोट्या माशाला खात असतो, म्हणून राष्ट्रीय समाज पक्षच मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही जनस्वराज्य यात्रा काढल्याचे जानकर म्हणाले.

जानकर पुढे म्हणाले, ‘घराणेशाही संपवून सामान्य माणूसही या देशाचा मालक झाला पाहिजे. हाच हेतू ठेवून देशात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आणण्यासाठी देशभरात राष्ट्रीय पक्षाच्या वतीने जनस्वराज्य यात्रा काढली आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी ही यात्रा काढली आहे .मतदारांना शेतकरी, युवक, युवती यांना जागृत करून जनतेचे राज्य आलं पाहिजे. या हेतूने मागील दीड महिन्यांपासून विठ्ठलाला साकडं घालून जनस्वराज्य जनस्वराज यात्रा काढली असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा घ्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीबाबत जानकर म्हणाले , ‘पवार साहेब आणि सुप्रिया ताई म्हटल्या की, अजित पवार आमचे नेते आहेत. मला असं वाटतं की या दोघांचं म्हणणं एकच असेल. या दोघांच्या भांडणात लक्ष न घालता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा राष्ट्रीय समाज पक्षाने घेतला पाहिजे,’ असे मत जानकर यांनी व्यक्त केले.

E Shivai Bus : स्वारगेटहून कोल्हापूरसाठी धावणार आठ ई-शिवाई बस

Talathi Bharti Exam 2023 : तलाठीपदाच्या परीक्षेसाठी उमेदवार पोहचले उशिरा!

Food Poisoning In Sangli : विषबाधा प्रकरणी संबंधिताची सखोल चौकशी करणार; मंत्री अतुल सावे

Back to top button