Talathi Bharti Exam 2023 : तलाठीपदाच्या परीक्षेसाठी उमेदवार पोहचले उशिरा! | पुढारी

Talathi Bharti Exam 2023 : तलाठीपदाच्या परीक्षेसाठी उमेदवार पोहचले उशिरा!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तलाठी भरती परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू असून, सोमवारी मुंबईतील पवई आयआयटी पार्क परीक्षा केंद्रावर काही परीक्षार्थी उमेदवार विलंबाने पोहचल्याने नियमानुसार संबंधितांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक पोलीस, महसूल आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांसमोर सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. त्यामध्ये परीक्षार्थी विलंबाने आल्याचे दिसून आले. दरम्यान, परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्यानंतर केलेल्या गोंधळाची रीतसर तक्रार प्रशासनाकडून पोलिसांकडे दाखल करण्यात आली. तसेच संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यभरात तलाठीच्या 4466 जागांसाठी परीक्षा सुरू आहे. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जात आहे. 17 ते 22 ऑगस्ट असा पहिला टप्पा नुकताच पार पडला. तर, दुसरा टप्पा 26 ऑगस्टपासून सुरू झाला. दरम्यान, सोमवारी मुंबईतील पवई आयआयटी पार्क परीक्षा केंद्रावर काही उमेदवार विलंबाने दाखल झाले. त्यामुळे त्यांना परीक्षा घेणार्‍या टीसीएस कंपनीकडून प्रवेश नाकारण्यात आला.

याबाबत माहिती देताना अप्पर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते म्हणाले, ‘नियमाप्रमाणे परीक्षार्थींनी वेळेच्या आधी दीड तास येणे अपेक्षित आहे. या वेळेत अर्ज भरलेलाच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आला आहे किंवा कसे, याची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येते. संबंधित उमेदवार परीक्षा केंद्रावर विलंबाने दाखल झाल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक पोलीस, महसूल आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये उमेदवार विलंबाने आल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला.

परीक्षा केंद्रावर गोंधळ

प्रवेश नाकारल्यानंतर संबंधित उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महसूल सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल सचिव यांच्याशी चर्चा केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही रायते यांनी सांगितले.

हेही वाचा

९ कैद्यांचा तीन तुरुंगाधिकाऱ्यांसह ७ कर्मचाऱ्यांवर फिल्मीस्टाइल हल्ला

सातारा : गतवर्षी धरणे 94 टक्के, यंदा 80 टक्क्यांवरच

रत्नागिरी : लाचखोर तलाठ्याविरोधात खेडमध्ये गुन्हा दाखल

Back to top button