पांढऱ्या सोन्याच्या दरातील घसरण सुरूच! | पुढारी

पांढऱ्या सोन्याच्या दरातील घसरण सुरूच!

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : प्रमुख बाजारपेठेत कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. दररोज १०० रुपयांची घसरण होत आहे. शनिवारी ६ हजार ५०० ते ६ हजार ७५० पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळत आहे. क्विंटलमागे जवळपास १००० ते १२०० रुपयांची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी कापूस विक्री करीत आहे. मात्र, खर्चाच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रारंभी कापसाचे भाव ८ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असलेल्या दरात घसरण सुरू असल्याने शेतकर्‍यांनी साठवलेला कापूस विक्री करण्यासाठी धडपडत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे कापसाचे हेक्टरी उत्पादन कमी झाले. कापुस उत्पादनाचा खर्च वाढला. मात्र, गतवर्षी प्रमाणे दरवाढीच्या अपेक्षेने कापूस विक्री न करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटाका बसला आहे. मागील महिन्यापासून सिल्लोड तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रावर कापसाच्या दरात सुधारणा होताना दिसत नाही. किमान ९ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली होती. शेती हंगाम जवळ आला आहे. नवीन बी-बियाणे, रासायनिक खते, अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखून ठेवलेला शेतमाल विक्रीस काढला. मात्र, कोणत्याही शेतमालाला खर्चाच्या तुलनेत जास्त दर मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कापसाचे भाव वाढेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता. दरम्यान, उन्हामुळे कापसाचे वजनही घटल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना बाजारपेठेत कमी भावामध्ये कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाढीव भावाच्या आशेने ठेवलेल्या कापसाच्या दराने आता शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या पांढर्‍या सोन्याने मात्र शेतकऱ्यांना यावेळी आर्थिक फटका बसला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले. उत्पादन घटले तर दर वाढतात, हे समीकरणही यावेळी फेल ठरले व साठा केलेल्या शेतकऱ्यांना तोटा झाला. आता शेतकरी कापूस विकण्याची घाई करीत आहे. त्यांच्याकडील सर्व कापूस संपल्यावर दर वाढल्यास त्याचा लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button