संशोधन : जुन्या दुखण्याची तीव्रता आता मोजता येणार; प्रथमच दिसल्‍या मेंदूतील तीव्र लहरी | पुढारी

संशोधन : जुन्या दुखण्याची तीव्रता आता मोजता येणार; प्रथमच दिसल्‍या मेंदूतील तीव्र लहरी

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासात प्रथमच मेंदूत निर्माण होणार्‍या वेदनादायी लहरींची नोंद झाली असून, त्याद्वारे एखाद्या रुग्णाला नेमक्या किती वेदना होत आहेत, हे समजू शकणार आहे. असह्य वेदनांवर उपचारात या तंत्रामुळे मदत होईल.

डॉक्टरांना आपण करत असलेल्या उपचाराचा रुग्णाला नेमका किती फायदा होतो आहे, त्याचे आकलन होण्यातही या तंत्राची मदत होणार आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी हे तंत्र विकसित केले. मेंदूतील वेदना टिपण्याची प्रक्रिया शोधण्यासाठी या संशोधकांनी वर्षभराहून जास्त काळ (जुने दुखणे असलेल्या) तीव्र वेदना सहन करत असलेल्या 4 जणांच्या मेंदूत इलेक्ट्रोड लावले होते. यापैकी 3 लोकांना स्ट्रोकनंतर वेदना सुरू झाल्या होत्या. चौथ्याचा एका अपघातात पाय गेला होता.

उपचार संपले तरी दुखणे कायम होते. या चौघा रुग्णांनी 3 ते 6 महिन्यांच्या काळात अनेकदा दुखण्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रत्येक उत्तरानंतर चारही रुग्ण (चाचणीचा भाग म्हणून) 30 सेकंद शांत बसून राहात असत. (जेणेकरून या काळात इलेक्ट्रोड मेंदूतील घडामोडी नोंदवू शकेल) प्रयोगाअंती संशोधकांना मेंदू संकेत रचनेतील जुन्या वेदनेच्या बायोमार्करची ओळख पटली. इलेक्ट्रोडच्या माध्यमातून मेंदूतील वेदनांना रोखले जाऊ शकते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

पुढे काय?

मेंदूत इम्प्लांट करण्यात आलेल्या इलेक्ट्रोडजवळ विजेचा सौम्य शॉक देऊन जुन्या वेदनांवर उपचार करता यावेत म्हणून संशोधक आता प्रयत्नशील आहेत.

Back to top button