नाशिक : शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश; सटाण्यात लागला मुख्यमंत्र्याचा अचानक दौरा | पुढारी

नाशिक : शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश; सटाण्यात लागला मुख्यमंत्र्याचा अचानक दौरा

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यात गेल्या तीन दिवसांत अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती असून दिलासा देण्यासाठी शासनाने संपूर्ण तालुकाभरात नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांनी केली आहे.

बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाने धिंगाणा घातला. दररोज दुपारी ठिकठिकाणी अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीट होतेय. ऐन काढणीवर आलेला उन्हाळी कांदा जमीनदोस्त झाला. तसेच काढून शेतात तसेच चाळीबाहेर ठेवलेला कांदा भिजून मोठा आर्थिक फटका बसला आहे. यासोबतच डाळिंबबागांची मोठ्या प्रमाणात फुलगळती झाली आहे. आंब्याच्या झाडांची फळे वाया गेली आहेत. सोबतच गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचीही मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी एकमेव नगदी पीक असलेल्या उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतकर्‍यांचे आगामी वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वादळी वार्‍यामुळे असंख्य राहत्या घरांची पत्रे उडून कुटुंब उघड्यावर आली आहेत. शिवाय पोल्ट्री फार्म व जनावरांच्या शेडचे पत्रेही वादळ वार्‍याने उडून आर्थिक हानी झाली आहे. साहजिकच अशा दुर्धर परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तालुक्यातील सर्व गावोगावी नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत आणि तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button