Air India flight : विमानात प्रवाशाने केला केबिन क्रूवर हल्‍ला, विमान पुन्‍हा दिल्‍लीला परतले! | पुढारी

Air India flight : विमानात प्रवाशाने केला केबिन क्रूवर हल्‍ला, विमान पुन्‍हा दिल्‍लीला परतले!

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून बेशिस्तपणाच्या घटना समोर येत आहेत. आज (दि.१०) पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली. एअर इंडियाच्या दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या AI 111 विमानात एका प्रवाशाने क्रू सोबत हुज्जत घालत, केबिन क्रू अर्थात कर्मचाऱ्यांना मारहाण करीत गोंधळ घातला. एअर इंडियाने या घटनेची गंभीर दखल घेत विमान पुन्हा दिल्लीकडे वळवले. बेशिस्त वर्तन करणाऱ्या प्रवाशाला सुरक्षा रक्षकांकडे सोपवण्यात आले असून, संबंधित व्यक्तीवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.

एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर विमानाने सकाळी साडेसहा वाजता लंडनच्या हिथ्रो विमानतळाकरिता उड्डाण केले होते. यानंतर काही वेळातच विमानातील प्रवाशाने गोंधळ घालत क्रू सोबत बेशिस्त वर्तन करण्यास सुरू केला. दरम्यान विमानातील दोन क्रू प्रवाशांनी गैरप्रकार करणाऱ्या प्रवाशाला शाब्दिक आणि लेखी सूचना दिल्या. परंतु, प्रवाशाने गैरप्रकार करणे सुरूच ठेवले क्रूवर हल्ला करत मारहाण केली.

प्रवाशाच्या विमानातील गदारोळाचा इतर प्रवाशांना नाहक त्रास झाला. त्यानंतर दुपारच्या सुमारास हे विमान लंडनसाठी रवाना करण्यात आले. दरम्यान प्रवाशाने केलेल्या मारहाणीत काही कर्मचारी जखमी झाले असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.  या घटनेची तात्काळ दखल घेत वैमानिकाने विमान पुन्हा दिल्ली विमानतळाकडे घेतले. यानंतर विमान विमानतळावर उतरवत,  संबंधित प्रवाशाला सुरक्षा रक्षकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विमान कंपनीने या घटनेबाबत दिल्ली विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, बेशिस्त वर्तन करणाऱ्या प्रवाशाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button