Jyotiraditya Scindia: आता विचारधारेशिवायची काँग्रेस उरली; केंद्रीय मंत्री शिंदे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका | पुढारी

Jyotiraditya Scindia: आता विचारधारेशिवायची काँग्रेस उरली; केंद्रीय मंत्री शिंदे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या विरोधात काम करणारा एक गद्दार वगळला तर, कोणत्याही विचारधारेशिवायची काँग्रेस आता शिल्लक राहिली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी बुधवारी (दि.०५) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केली. अवमान प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर आपल्या नेत्याला खास वागणूक मिळावी, असा अट्टाहास काँग्रेस पक्ष धरतो. तसेच त्यातून न्यायव्यवस्थेलाही वेठीस धरले जाते, असा मुद्दा शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडला.

मागास समाजाचा अपमान करणे, लष्कराच्या शौर्याचे पुरावे मागणे, चिन्यांकडून मारहाण झालेल्या सैनिकांबद्दल टीका टिप्पणी करणे अशी अनेक चुकीच्या स्वरुपाची कामे काँग्रेसने केलेली आहेत. काँग्रेसकडे आता कोणतीही विचारधारा राहिलेली नाही. त्यांच्याकडे देशाविरोधात बोलणारा एक गद्दार तेवढा उरला आहे, असा टोला शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर मारला आहे.

विशेष म्हणजे भाजपमध्ये येण्यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात असत. वर्ष 2020 मध्ये गांधी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम केला होता. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्यात शिंदे यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.

राहुल गांधी यांची वैयक्तिक कायदेशीर लढाई ही काँग्रेसची लढाई असल्याचे भासविले जात आहे. लोकशाही मूल्ये त्यासाठी बाजूला सारली जात आहेत. त्यासाठी रोज नवे निचांक केले जात आहेत. नेत्यांची फौज तयार करुन न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. संसदेचे कामकाज बाधित केले जात आहे. काँग्रेसमध्ये काही लोक प्रथम दर्जाचे आहेत. त्याचमुळे राहुल गांधी यांना सर्वसाधारण न्यायिक प्रक्रिया लागू होत नसल्याचा आव काँग्रेस आणत असल्याचा टोलाही शिंदे यांनी मारला.

हेही वाचा:

Back to top button