जर्मनी वृद्धत्वाकडे, महाराष्ट्रातून हवे कुशल मनुष्यबळ; जर्मनीच्या वाणिज्यदूतांनी व्यक्त केली अपेक्षा

जर्मनी वृद्धत्वाकडे, महाराष्ट्रातून हवे कुशल मनुष्यबळ; जर्मनीच्या वाणिज्यदूतांनी व्यक्त केली अपेक्षा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  जर्मनी सध्या नव्या समस्येला तोंड देत आहे. जर्मन समाज वृद्धत्वाकडे झुकत चालला आहे. वृद्धत्वामुळे जर्मनीला नर्सेस, इलेक्ट्रिशिअन, आदरातिथ्य क्षेत्र, सोलर युटिलिटी तंत्रज्ञ आदी क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळाची कमतरता भासतेय. ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा आहे, असे मत जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी व्यक्त केले.

चेन्नई येथे वाणिज्यदूत म्हणून काम केलेल्या एकिम फॅबिग यांची जर्मनीच्या मुंबईतील वाणिज्यदूतपदी नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर फॅबिग यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जर्मनीच्या ८०० कंपन्या आज भारतात काम करत असून त्यापैकी किमान ३०० कंपन्या पुणे येथे आहेत. जर्मनीतून येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीने मुंबई तसेच नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष युरो गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.

जर्मनीतील महाराष्ट्रात काम करीत असलेल्या कंपन्या राज्यात खूश असून त्यांना कुठल्याही समस्या नाहीत. जर्मनीने मुंबई तसेच नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष युरो गुंतवणूक केली आहे. सध्या ३५ हजार भारतीय विद्यार्थी जर्मनीमध्ये शिकत असून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. एकट्या बर्लिनमध्ये १७ हजार भारतीय आयटी तंत्रज्ञ राहात आहेत. यावर्षी जर्मनीला २०० नर्सेसची आवश्यकता असून त्या दृष्टीने केरळ येथील एका नर्सिंग कॉलेजशी करार करण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

जर्मनीला पूर्ण सहकार्य : राज्यपाल

दरम्यान, जर्मनीची सध्याची कौशल्याची गरज पुरविण्यासाठी महाराष्ट्र निश्चितच मदत करेल. महाराष्ट्रात नव्यानेच राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. जर्मनीने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात सहकार्य केल्यास त्यांची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला. तसेच जर्मनीला महाराष्ट्राकडून नेहमीच सहकार्य केले जाईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news