नागपूर : तहसीलदार, उपजिल्हाधिकारीही जाणार बेमुदत संपावर…! | पुढारी

नागपूर : तहसीलदार, उपजिल्हाधिकारीही जाणार बेमुदत संपावर...!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी २७ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानभरपाईच्या पंचनाम्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेणयात आला. ३ एप्रिलनंतर नुकसान भरपाईच्या पंचनाम्याची प्रक्रिया व शेतकऱ्यांना मिळणारी मदत लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तहसीलदार, नायब तहसीलदार २७ मार्चपासून लेखणीबंद आंदोलनाच्या माध्यमातून संपात सक्रिय सहभागी होणार आहेत. या काळात कायदा सुव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती संदर्भातील कामे पार पाडली जाणार असून हे दोन विषय वगळता इतर कामे होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास ३ एप्रिलपासून संघटनेचे नियोजित बेमुदत काम बंद आंदोलन देखील सुरू होणार आहे.

राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी संपावर गेले असून, आज संपाचा सातवा दिवस आहे. मागणीसाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी काम बंदची हाक दिली आहे. या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून संप काळात विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. जिल्हानिहाय कर्मचारी, शिक्षक काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत. तसेच निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच या दिवशी जिल्हा न्याय कर्मचारी, शिक्षक कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निषेध व्यक्त करणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button