Old Pension Scheme : पंचनाम्याअभावी आमच्या संसारावर वरवंटा फिरु दे का? राजू शेट्टींचा सरकारी कर्मचाऱ्यांना सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : २००५ मध्ये राज्याने रद्द केलेली जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह इतर विभागतील राज्य सरकारी कर्मचारी देखील या संपात सहभागी आहेत. या संपामुळे सरकारी रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. याचा ग्रामीण भागातील सरकारी कार्यालयांवरही परिणाम दिसून येत आहे. विविध विभागांकडून आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने नागरिक रिकाम्या हातानेच परतत आहेत. या संपामुळे नागरिकांची अनेक कामे रखडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ट्वीट करत संपकरी कर्मचार्यांना धारेवर धरलं आहे. (Old Pension Scheme )
Old Pension Scheme :आमच्या संसारावर आता वरवंटा फिरु दे का ?
१४ मार्चपासून बेमुदत संपावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक कविता शेअर करत धारेवर धरलं आहे. त्यांनी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा त्यांच्याच शब्दात…
कांदा आंदोलन झालं, कवडीमोल भावाने विकला..
पण तुमच्या भाज्या बेचव होऊ दिल्या का ?
ऊस आंदोलन झालं, कारखाने बंद केले.
पण चहातला गोडवा कमी होऊ दिला का ?
दूध आंदोलन झालं, वासरांना दुधाने अंघोळ घातली.
पण तुमची लेकरं ऊपाशी झोपु दिली का ?
ब-याचवेळा सरकारी कार्यालयांना घेराव घातला.
पण महिला कर्मचा-यांची गैरसोय होऊ दिली का ?
सरकारशी संघर्ष झाला, रास्ता रोको केला.
जीवन-मरणाच्या दारात ऊभ्या असणा-या रुग्णांची अडवणुक केली का ?
आम्ही संप पुकारले, बंद ची हाक दिली.
कधी विद्यार्थ्यांना त्रास दिला का ? अत्यावश्यक सेवा थांबवल्या का ?
सरकारी संपक-यांनो, आज गारपीट झाली, अवकाळी झाला.
आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का ?
आमच्या फळबागा गेल्या, धान्य- भाजीपाला सगळं वाहून गेलं…
पंचनाम्याअभावी आमच्या संसारावर आता वरवंटा फिरु दे का ?
– राजू शेट्टी
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या…
- नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी
- बक्षी समिती अहवालाचा खंड-२ लिपिक व इतर संवर्गीय चेतन त्रुटी दूर करून प्रसिद्ध करावा
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नका
- सर्वांना समान किमान वेतन देऊन कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करा,
- सर्व रिक्त पदे तत्काळ भरा
- अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिनाशर्त करा.
- कोरोनाकाळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादित सूट द्या,
- निवृत्तीचे वय ६० वर्षे करा
आदी मागण्यांसाठी हा संप सुरु आहे.
— Raju Shetti (@rajushetti) March 20, 2023
हेही वाचा
- Empowerment of women : भारतातील केवळ ३३ टक्के महिलाच इंटरनेट वापरतात; UN च्या रिपोर्टमधून खुलासा
- Gujarat High Court : विवाहित ‘गर्लफ्रेंड’चा ताबा मागणाऱ्या रोमिओला न्यायालयाचा दणका, ठोठावला ५००० रुपयांचा दंड
- पिंपरी : पोटाची खळगी भरायची की मुलांना शिकवायचं; चिमुरड्यांना शिकविण्यासाठी मजुरांची धडपड