पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्राच्या महिला संघटनेच्या 'ऑन द स्टेटस ऑफ वुमन' आयोगाने रविवारी (दि.१९) डिजिटल जगातील महिलांविरूद्धचा भेदभाव नष्ट करण्यासाठी घोषणापत्र जाहीर केले आहे. यामध्ये डिजिटल युगातील नावीन्यपूर्ण, तांत्रिक बदल आणि शिक्षण यासंदर्भात लैंगिक समानता आणि महिला, मुलींच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यापूर्वी संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमध्ये भारतात केवळ ३३ टक्के महिलाच इंटरनेटचा वापर करतात, असे नमूद करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला आयोगाकडून आयोजित स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण या मेळाव्यात डिजिटल युगात पुरूषांचे वर्चस्व वाढत असून, जगभरातील महिलांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी देखील डिजिटल लिंगभेद हा असमानतेचा एक नवा चेहरा बनू पाहत आहे. महिलांना सध्या नवीन असमानतेचा सामना करावा लागत आहे. डिजिटल जगातील पुरूषांचे वर्चस्व येत्या काही दिवसात अडचणी निर्माण करू शकतात. डिजिटल जगातील पुरूषांच्या वर्चस्वामुळे डेटामधून देखील AI देखील लैंगिक भेदभाव करेल; अशी भिती गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे.
डिजिटल जगातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिलांच्या ऑनलाईन होणाऱ्या छळाविरूद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. ऑनलाईन महिलांविरूद्ध होणाऱ्या हिंसाचार आणि छळवणुकीला महिलांनी खंबीरपणे सामोरे जाणे गरजेचे आहे, असेही 'ऑन द स्टेटस ऑफ वुमन' या संयुक्त राष्ट्र महिला आयोगाने सादर केलेल्या घोषणापत्रात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महिला आयोगाकडून सादर करण्यात आलेल्या घोषणापत्रामुळे जगभरातील महिलांना डिजिटल जगात समान संधी मिळेल, असे मत यूएन वुमनच्या कार्यकारी संचालक सीमा बहौस यांनी व्यक्त केले आहे.