V. V. Karmarkar : ‘क्रीडा पानाचे जनक’ वि. वि. करमरकर यांचे निधन | पुढारी

V. V. Karmarkar : 'क्रीडा पानाचे जनक' वि. वि. करमरकर यांचे निधन

पुढारी वृत्तसेवा :  मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळख असणारे माजी क्रीडा संपादक, समीक्षक, लेखक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर (V. V. Karmarkar) यांचे आज (दि.५)  सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंधेरी येथे पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

V. V. Karmarkar : क्रीडा पानाचा पहिला प्रयोग

वि. वि. करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांनी एमए करत  पत्रकरितेची वाट निवडली. त्यामध्ये ते  क्रीडा पत्रकारीता करु लागले. १९६० च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली. १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर होते. तेथे दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. संपूर्ण मराठी दैनिकांच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला.

चौकार,षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी…

चौकार,षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी, टे टे दापाझो, राकेफ असे अनेक सोपे सुटसुटीत शब्द याची निर्मिती त्यांनी केली. मराठी भाषा ओघवती आणि प्रभावी करायची असेल तर ती आधी सोपी असली पाहिजे, याचा त्यांनी कायम अट्टाहास धरला. परिणामी त्यांच्या बातम्या आणि लेख माहितीसह खूप परिणामकारक ठरले. आपल्या धावत्या समालोचनात सोप्या आणि आपण निर्मित केलेल्या शब्दांची पेरणी ते अचूक करीत असत. यामुळे श्रोत्यांना अधिक तपशीलपूर्ण माहिती मिळत असे.

हेही वाचा 

Back to top button