नाशिक : कोरोनाने साडेतीन हजार फेरीवाल्यांचा हिसकावला रोजगार | पुढारी

नाशिक : कोरोनाने साडेतीन हजार फेरीवाल्यांचा हिसकावला रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महामारीने केवळ मृत्यूचा तांडवच घडविला नसून, अनेकांच्या हातचा रोजगार हिसकावून घेतला आहे. फेरीवाल्यांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. नाशिक महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या यादीत तब्बल साडेतीन हजार फेरीवाल्यांचा रोजगार हिरावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेने तीन वर्षांपूर्वी शहरातील १० हजार ६१४ फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली होती. पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी कोरोनानंतर करण्यात आलेल्या फेरसर्वेक्षणात ही संख्या तब्बल ३ हजार ३५५ ने घटली आहे. सर्वेक्षणात केवळ ७ हजार २५९ फेरीवाल्यांचीच नोंद झाली आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे, त्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत प्रयत्न केले जात आहेत. यानुसार नाशिक महापालिकेने शहर फेरीवाला समितीचे गठण करत २०१४ मध्ये शहरातील फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले होते. त्यावेळी शहरात ९ हजार ६२० फेरीवाले असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये सर्वेक्षण केल्यानंतर २ हजार ९२६ नवीन फेरीवाले आढळून आले. मात्र, या सर्वेक्षणाविषयी नगरसेवक, नागरिक तसेच फेरीवाल्यांनी आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने तीन वर्षांपूर्वी सर्वेक्षण यादीतील फेरीवाल्यांची दुबार नावे रद्द करत फेरीवाल्यांची १० हजार ६१४ संख्या अंतिम केली होती.

केंद्राने कायद्यात सुधारणा करत ३० सदस्यीय शहर फेरीवाला समितीऐवजी २० सदस्यीय नगर पथविक्रेता समितीचे गठण करण्याचे निर्देश महापालिकेला दिल्यानंतर या समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी महापालिकेने निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनानंतर महापालिकेने विभाग स्तरावर फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण करत प्रारूप मतदारयादी जाहीर केली. या यादीत ७ हजार २५७ फेरीवाल्यांची नोंद आहे. प्रारूप मतदारयाद्यांवरील हरकतींनंतर मतदारयादीत दोन फेरीवाल्यांचा समावेश झाला आहे. मात्र, कोरोना काळात फेरीवाल्यांच्या संख्येत तब्बल ३ हजार ३५५ ने घट झाल्याचे धक्कादायक वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे. कोरोनामुळे काहींचा बळी गेला तर कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे काहींना आपले व्यावसायच बंद करावे लागले. त्यामुळे फेरीवाल्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे.

आज अंतिम मतदारयादी

महापालिकेने पथविक्रेता समितीच्या सदस्य निवडणुकीसाठी नोंदणीकृत फेरीवाल्यांची प्रारूप मतदारयादी जाहीर केली होती. या यादीवर हरकती व सूचनांकरिता सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत तीन हरकती फेरीवाला विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यातील दोन हरकती मान्य करण्यात आल्या असून, दोन फेरीवाल्यांचा समावेश अंतिम मतदारयादीत करण्यात येत आहे. अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.९) जाहीर केली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) करुणा डहाळे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button