नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
यंदा कोविडचे संकट दूर झाल्याने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तसेच येथून दरवर्षी महाशिवरात्रीस पहाटे चार वाजता सर्व साधूंनी एकत्र येऊन मिरवणुकीने कुशावर्तावर स्नानासाठी जाण्याचा निर्णय निरंजनी आखाड्यात साधू-महंतांच्या बैठकीत घेण्यात आला.
यंदा महाशिवरात्र 18 फेब्रुवारीला असून, पहाटे चारला सर्व साधू कुशावर्तावर स्नानासाठी जातील. तेथे स्नान करून सर्व मिरवणुकीने भगवान त्र्यंबकराजाच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेतील. दर्शन आटोपल्यानंतर सर्व साधू मिरवणुकीने पुन्हा एकत्र येऊन मिरवणूक विसर्जित करतील. यामध्ये सर्व आखाड्यांचे, आश्रमांचे, मठांचे साधू सहभागी होणार आहेत.
बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, आनंद आखाड्याचे महंत व षडदर्शन आखाडा परिषद अध्यक्ष शंकरानंद महाराज, सेक्रेटरी सहजानंद गिरी महाराज, बृहस्तपतीगिरी महाराज, ठाणापती धनंजय गिरी, जुना उदसी आखाड्याचे ठाणापती देवीदास महाराज, नया उदासी आखाड्याचे ठाणापती गोपालदास महाराज, जुना आखाडा ठाणापती महेंद्रगिरी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे ठाणापती महंत अजयगिरी महाराज, महंत श्रीनाथानंद महाराज, महंत सिद्धेश्वरानंद महाराज, नगरसेवक श्यामराव गंगापुत्र, पंडित सतीश दशपुत्रे यांसह विविध आखाडे आश्रम मठ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज यांनी महाशिवरात्रीचा पर्वकाळ साधण्यासाठी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे देश-विदेशातून शिवभक्त येतात. सर्व आखाडे या पर्वकालसमयी स्नान करून मिरवणुकीने दर्शनास जातील व विश्वकल्याण, शांती, समृद्धीसाठी भगवान शिवाची आराधना करतील असे स्पष्ट केले.
हेही वाचा :