नगर : यंदा 198 गावांत निवडणुकांचा धुरळा | पुढारी

नगर : यंदा 198 गावांत निवडणुकांचा धुरळा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 198 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये नगर तालुक्यातील नागरदेवळेे, वडारवाडी व बाराबाभळी या तीन नवीन ग्रामपंचायतींचा देखील समावेश आहे. सध्या या ग्रामपंचायतींची प्रभागरचना सुरु आहे. 25 एप्रिलला अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा मे महिन्यात उडणार आहे.  ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच सार्वत्रिक निवडणुका घेतली जाते. मात्र, जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात काही ग्रामपंचायतींचा कालावधी संपणार आहे.

मात्र, राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही. त्यामुळे मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले जात आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी सुरु केली. नगर तालुक्यात पुन्हा नव्याने स्थापन झालेल्या नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीन ग्रामपंचायतींसह 198 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार 30 जानेवारीपासून प्रभागरचनेस प्रारंभ झाला आहे. प्रभारचनेचे काम एप्रिल महिन्यापर्यंत चालणार आहे. त्यानंतर 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुरळा उडणार आहेत.

राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायती
या वर्षात आश्वी बुद्रूक व खर्दु, दाढ बुद्रूक, पिंपरी निर्मळ, चितळी, पुणतांबा-रस्तापूर, उंदिरगाव, उक्कलगाव, दत्तनगर, फत्याबाद, नाऊर, बारागाव नांदूर, टाकळीमियाँ, मुसळवाडी, देसवंडी, सडे, भानसहिवरा, पाचेगाव, पानसवाडी, मुकिंदपूर, शहरटाकळी, मुंगी, बोधेगाव, करंजी, चिंचोडी, डमाळवाडी, जवळा, खेड, विसापूूर, लोणी व्यंकनाथ, कोळगाव, वाडेगव्हाण, कान्हूरपठार, अरणगाव, वडगाव गुप्ता, नागरदेवळे आदी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींसह 198 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

51 ग्रामपंचायतींवर प्रशासक
जानेवारी ते जूनपर्यंत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. जानेवारी महिन्यात 51 ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकार्‍यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले आहेत.

 

Back to top button