Crime News : एकमेकांकडे पाहणे आणि थुंकल्याच्या रागातून बिबवेवाडीत गोळीबार | पुढारी

Crime News : एकमेकांकडे पाहणे आणि थुंकल्याच्या रागातून बिबवेवाडीत गोळीबार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोळीबाराच्या घटनेनंतर बिबवेवाडीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एकमेकांकडे पाहणे आणि थुंकल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. गुरुवारी (दि.25) रात्री दुर्गामाता गार्डनजवळील गल्लीत हा प्रकार घडला आहे. एक कार तसेच चार रिक्षांची तोडफोड केली आहे. तर, दुचाकी गाड्या ढकलून देत त्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळातच शहरातील गुन्हेगारी उफाळल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात धोंडिराम महादेव रावळ (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, पोलिसांनी शुभम नंदकिशोर सगरे (वय 24), रवी आनंद चव्हाण (वय 19) या दोघांना ताब्यात घेतले असून, सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात गेल्या आठवड्यात गोळीबाराच्या चार घटना सलग घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तर दुसरीकडे सोनसाखळी तसेच लूटमार करणार्‍या चोरट्यांनी देखील चांगलाच उच्छाद घातला आहे. एकीकडे शहरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दुसरीकडे शहरात गोळीबार तसेच दहशत माजविण्याच्या घटना घडत आहेत. गोळीबाराचे प्रकरण शांत होत असतानाच बिबवेवाडीत पुन्हा वाहन तोडफोडीचा प्रकार घडला आहे.

किरकोळ कारणावरून टोळक्याने एक कार तसेच चार रिक्षांची हत्याराने तोडफोड केली. त्यानंतर आठ ते दहा दुचाकी ढकलून देत त्यांचे नुकसान केले आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. टोळक्याने दहशत माजविण्यासाठी हा उद्योग केल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत आमच्याकडे पाहून थुंकल्याने तसेच रागाने पाहिल्यावरून हा वाद झाल्याचे समजते. पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.

हेही वाचा

Back to top button