परवानगी नाकारली तरी ‘मविआ’ मोर्चा काढणारच : अजित पवारांची ‘दादा’गिरी | पुढारी

परवानगी नाकारली तरी 'मविआ' मोर्चा काढणारच : अजित पवारांची 'दादा'गिरी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सीमाप्रश्न, महागाई आणि बेरोजगारी यासह अन्य प्रश्नांसाठी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही. मोर्चासाठी परवानगी मिळेल, परंतु परवानगी नाकारली तरी महामोर्चा काढणारच, असे आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिले आहे. मोर्चासंदर्भात आयोजित महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ‍‍माजी मुख्यमंत्री अशोक चव्हा‍ण उपस्थित होते.

या वे‍ळी अजित पवार म्हणाले की, राजकीय मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत; पण लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परवानगी मागण्याचा आमचा अधिकार आहे तसा परवानगी नाकारण्याचा अधिकार सरकारचा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. मंत्र्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जात आहे. सीमाप्रश्नासोबतच महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न जनतेला सतावत आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे. मोर्चाला परवानगी नाकारली तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धारही त्‍यांनी केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कालच्या दिल्लीच्या बैठकीत वेगळ अस काय झालं? बोम्मईंच ट्विट फेक होतं याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त होयबा केलं. सरकार महाराष्ट्राचे आहे, मग महाराष्ट्राची बाजू का मांडली जात नाही? सुप्रिम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना बेळगावला उपराजधानी जाहीर कशी केली, असा सवाल त्यांनी केला आहे. मोर्चाची तयारी झाली आहे. निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र प्रेमींनी मोर्चात सहभागी व्हावं, हीच ती वेळ आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button