

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लालबाग, भारत माता येथील वन अविघ्न पार्क या इमारतीच्या २२ व्या मजल्यावर सकाळी पावणे अकराच्या सुमारास लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. आग मोठी नसल्यामुळे अग्निशमन दलाने एक नंबर वर्दीचा कॉल दिला होता. मात्र या आगीची माहिती मिळतात रहिवाशांमध्ये पळापळ झाली. या अगोदरही या इमारतीला आग लागल्यामुळे काही रहिवाशांनी खबरदारी म्हणून अगोदरच आपले घरे रिकामी केली होती.
लालबाग महादेव पालव मार्ग येथील आलिशान वन अविघ्न पार्क या टोलेजंग इमारतीच्या २२ व्या मजल्यावर ११ च्या सुमारास आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. याअगोदर इमारतीला लागलेल्या आगीमुळे रहिवासी सतर्क होते. त्यामुळे आग लागल्याची माहिती मिळताच रहिवासी इमारतीतून बाहेर पडले. अवघ्या एक ते दीड तासात अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र ज्या सदनिकेमध्ये आग लागली होती तेथे धुराचा मोठा लोट दिसत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाने आजूबाजूचा परिसर सील केला होता. या इमारतीच्या सर्व लिफ्ट बंद करण्यात आल्या आहेत.
अग्निशमन दलाने टर्न टेबल लॅडरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत वित्तहानी झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :