Share Market Crash | सेन्सेक्सची दाणादाण! IT स्टॉक्सची खराब कामगिरी, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं? | पुढारी

Share Market Crash | सेन्सेक्सची दाणादाण! IT स्टॉक्सची खराब कामगिरी, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं?

Share Market Crash : अमेरिकेची प्रमुख मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली. याचे पडसाद आज गुरुवारी (दि.१५) आशियाई शेअर बाजारात उमटले. या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सुरुवातीपासून सुरु झालेली घसरण बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली. बाजार बंद होण्याआधी काहीवेळ सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी कोसळला होता. त्यानंतर ही घसरण ८७८ अंकांची होऊन सेन्सेक्स ६१,७९९ वर बंद झाला. तर निफ्टी २४५ अंकांनी घसरून १८,४१४ वर बंद झाला.

फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आणखी वाढ करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर माहिती तंत्रज्ञान (IT) शेअर्संना मोठा फटका बसला. आयटी शेअर्स घसरले. प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तो सुमारे १.५ टक्क्याने खाली आला. आयटी निर्देशांकातील सर्व दहा विभागात घसरण पहायला मिळाली. दरम्यान, बँक निफ्टी निर्देशांकाचा विक्रमी उच्चांक गाठण्याचा दोन दिवसांचा सिलसिला थांबला. तो ४४ हजारांच्या खाली म्हणजेच ४३,९०० वर आला.

अमेरिकेत मंदीचे सावट आहे. यामुळे आयटी क्षेत्र चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर आयटी शेअर्स सुमारे १.५ टक्क्यांनी घसरले आहेत. इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएलच्या शेअर्संमध्ये २ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. निफ्टीच्या ५० पैकी ४१ शेअर्समध्ये घसरण झाली. सेन्सेक्सवरील ३० पैकी २७ शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला.

कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले?

SBI लाइफ इन्शुरन्स, हिरो मोटो कॉर्प, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स आणि बीपीसीएल यांचे शेअर्स NSE निफ्टी ५० वर आघाडीवर होते. तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, टायटन, टीसीएस लि. आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांचे शेअर्स मागे पडले होते. बीएसईच्या २० क्षेत्रीय निर्देशांकांपैकी सतरा निर्देशांक खाली गेले होते. पण बीएसई रियल्टी, बीएसई ऑइल अँड गॅस आणि बीएसई एनर्जी ‍वधारले होते.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स ‍वधारले

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्सं गुरुवारी तेजीत होते. बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, एसबीआय आणि यूको बँक यासह तब्बल सहा पीएसयू बँकांच्या शेअर्संनी ५२ आठवड्यांच्या उच्चांक गाठला.

IRCTC चे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर्स गुरुवारच्या व्यवहारात ५ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर हा शेअर ५.१७ टक्क्यांनी घसरून ६९६.७० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

आशियाई बाजारातही पडझड

फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या निर्णयानंतर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक घसरले. डाऊ जोन्स आणि नॅस्डॅक हे निर्देशांक अनुक्रमे ०.४ टक्क्याने आणि ०.७ टक्क्याने घसरले. तर आशियातील बाजारांवर नजर टाकली तर जपानचा निक्केई निर्देशांक ०.२५ टक्क्यांनी घसरला तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक १.७४ टक्क्यांनी घसरला. शांघाय कंपोझिट इंडेक्स ०.४६ टक्क्यांनी खाली आहे तर दक्षिण कोरियाचा KOSPI ०.४ टक्क्यांनी खाली आला होता.

आणखी दरवाढीचे संकेत

महागाईने हैराण झालेल्या अमेरिकेतील जनतेला दिलासा देण्यासाठी फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे आणि आणखी दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. या व्याजदरवाढीमुळे या बँकेच्या व्याजदराची श्रेणी ४.२५ टक्क्यांवरून ४.५ टक्क्यांवर पोहोचली आहे. हा दर १५ वर्षातील सर्वाधिक आहे. फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी म्हटले आहे की, दरवाढीच्या एकत्रित परिणामाला अर्थव्यवस्था कसा प्रतिसाद देत आहे हे पाहण्यासाठी बँकेला दरवाढीची गती कमी करायची आहे. (Share Market Crash)

हे ही वाचा :

Back to top button