भाऊ साठे यांची एक्झिट; आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार हरपले | पुढारी

भाऊ साठे यांची एक्झिट; आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार हरपले

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

अबोल शिल्पांना बोलके करण्याची किमया सदाशिव उर्फ भाऊ साठे या जादूगाराच्या हातात होती. ते जगाच्या पाठीवरील शिल्पकारांच्या शिरपेचातील महामेरू होते. त्यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी सोमवारी रहात्या घरी सकाळी निधन झाले. भाऊंच्या जाण्याने मूर्तीकला साधनेत अत्यंत मोठी पोकळी निर्माण झाल्याची खंत कलाकार, कलावंतांनी व्यक्त केली.

भाऊ साठे कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात असलेल्या साठेवाडा येथे राहत होते. भाऊंच्या पश्चात मुलगा श्रीरंग, सून, नात असा परिवार आहे. त्यांची पत्नी नेत्रा साठे या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार आणि लेखिका देखील होत्या. काही वर्षांपूर्वी नेत्राताईंचे निधन झाले. त्यांचे भाऊ डॉ. श्रीनिवास साठे हे इतिहास अभ्यासक आहेत. तर दुसरे बंधू वामनराव साठे हे जनता सहकारी बँकेचे संस्थापक आहेत.

काका हरी रामचंद्र साठे हाेते प्रेरणास्थान

 साठे कुटुंबीय आणि कला यांचे अतूट नाते आहे. त्यांच्या घराण्यात प्रत्येकाकडे कला आहे. सदाशिव साठे हे 1944 साली मॉडेलिंग शिक्षण घेण्यासाठी मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये दाखल झाले. काका हरी रामचंद्र साठे हे त्यांचे प्रेरणास्थान होते. ते गणपती करत असत. तेथे भाऊंनी आपला श्रीगणेशा केला.

दिल्‍लीत ‘शिल्पकले’च्या जीवनाला सुरुवात

पुढे 1948 साली भाऊ डिप्लोमा घेऊन बाहेर पडले. परंतु देशात पारंतत्र्याचे वातावरण होते. तेव्हा प्रथम स्वतंत्र भारत हेच सर्वांचे ध्येय होते. अशा अस्थिर परिस्थितीत शिल्पकार करमरकर यांच्याशी संपर्क आला सन 1950-51 सालाच्या काळात राजकमल येथे नोकरी करून पुढे त्यांनी 1952 साली शिल्पकलेसाठी दिल्लीवर स्वारी केली. दिल्ली नगर निगमने त्यांच्यावर महात्मा गांधींचा पुतळा करण्याचे काम सोपविले. तेथून त्यांच्या शिल्पकलेच्या (व्यावसायिक) जीवनाला सुरुवात झाली.

भाऊंनी दिल्लीत 1954 साली गांधीजींचे शिल्प उभारले. त्यानंतर 2014 मध्ये गुजरात राज्यातील दांडी येथे महात्मा गांधी यांचे शिल्प उभारले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, पंडित जवाहरलाल नेहरू, राणी एलिझाबेथ, लॉर्ड माऊंटबॅटन, नेताजी सुभाषचंद्र बोस, अटलबिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची भाऊ साठे शिल्पे उभारली आहेत.

डोंबिवलीत उभारले शिल्पालय

शिल्प तयार करण्याबाबत याच भाऊंनी आकार नावाने पुस्तकही लिहिले आहे. हे पुस्तक शिल्पकलेच्या अभ्यासकांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत उपलब्ध आहे.याच भाऊंनी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1 मध्ये एक शिल्पालय उभारले आहे. त्यात त्यांची शिल्पे ठेवली आहेत. शिल्पकलेत करिअर करू इच्छिणाऱ्या भावी शिल्पकारांना मार्गदर्शक ठरू शकतात, असे हे शिल्पालय मानले जाते. कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचे भाऊ सभासद हाेते. त्यांचे पणजोबा रावबहादूर साठे यांनी कल्याण सार्वजनिक वाचनालय 1864 मध्ये सुरू केले. साठे हे कल्याण गायन समाजाचे काही काळ अध्यक्ष होते. या कलासक्त शिल्पकाराचा भारत सरकारने सन्मान करणे अपेक्षित होते.

वाचनालयाच्यावतीने साठे यांना पद्म पुरस्कार मिळण्याकरिता 13 सप्टेंबर 2017 रोजी सरकारकडे तसा पत्रव्यवहार करण्यात आला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित सचिवाकडे याबाबतचे सर्व पुरावे देऊन चर्चाही करण्यात आली होती. लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त कल्याणच्या शाळेत आल्या असताना त्यांच्याकडेही साठे यांना पद्म पुरस्कार मिळण्याकरिता शब्द टाकण्याची विनंती कल्याणमधील कलावंत, रसिक यांनी केली होती. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही पद्म पुरस्कारासाठी सरकारदरबारी शिफारस करण्याचे मान्य केले होते. या सगळ्या पाठपुराव्यानंतरही साठे यांचे नाव पद्म पुरस्काराच्या यादीत समाविष्ट झाले नाही. स्वत: साठे यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संंबंध होते.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा  भाऊ साठे यांनी  साकारला आहे. भाऊ साठे यांना आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार संबोधून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे शिल्प घडविण्याची विनंती केली होती. यशवंतरावांच्या विनंतीवरुन अवघ्या सहा महिन्यांत भाऊंनी हा पुतळा उभारला हाेता.

शिल्पकलेच्या या प्रतिभावंत पूजकाच्या पार्थिवावर कल्याणमधील स्मशानभूमीत संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, कलाक्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button