माळरानावर अत्तराची दरवळ, सोलापूरमधील शेतकऱ्याने फुलविली जिरेनियमची शेती | पुढारी

माळरानावर अत्तराची दरवळ, सोलापूरमधील शेतकऱ्याने फुलविली जिरेनियमची शेती

माळरानावर अत्तराची दरवळ

काळाचे वेध घेत शेतीही बदलत आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी, हवामान बदल, कीड, रोगराईवर मात करत देशातीलच नव्हे, तर परदेशातील पिकांचे उत्पादन घेत शेतकरी ग्लोबल होत आहेत. त्यांच्यातील प्रयोगशीलता पाहण्यासाठी राज्यासह परराज्यांतील अभ्यासक हजेरी लावत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडातांडा येथील राजू राठोड यांनी चक्‍क जिरेनियमच्या रूपात माळरानावर अत्तराची शेती फुलविली आहे. यामुळे त्यांच्या शेतशिवारातून उत्पन्‍नरूपी सुगंध दरवळत आहे.

केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजू राठोड यांना शेतीत विविध प्रयोग करण्याची आवड आहे. यातूनच त्यांनी पारंपरिक शेतीला हळूहळू फाटा देत भाजीपाला, उसाची लागवड केली. हवामान बदल, रोगराईचा भाजीपाल्यावर मोठा प्रादुर्भाव होऊ लागला. उसाला जास्त पाणी लागते. प्रचंड त्रास घेऊन उत्पन्‍न घेतल्यानंतर त्याच्या उत्पन्‍नाबरोबरच हमीभावाची शाश्‍वती नाही. यातून सुटका करून घेण्यासाठी नव्या पिकाच्या ते शोधात होते. तेव्हा पाटबंधारे विभागात कार्यरत असलेले त्यांचे बंधू विजयकुमार राठोड यांनी जिरेनियमची माहिती दिली. याचा अभ्यास करून त्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून पावणेदोन एकर क्षेत्रात जिरेनियमची लागवड केली. चार महिन्यांचे हे पीक आहे. वर्षातून तीनवेळा त्याचे उत्पन्‍न मिळते. उसापेक्षाही फारच कमी पाणी लागते. त्याला कीड, रोगराई याचा प्रादुर्भावही होत नाही. भावही चांगला आहे. यामुळे त्यांनी याची लागवड केली. एका टनाला 900 ग्रॅम, तर एकरी नऊ किलो तेल निघते. प्रतिकिलो त्याचा दर सध्या 11 हजार 500 इतका असून, गतवर्षी हा दर 12 हजार 500 इतका होता. एका रोपाची किंमत सहा रुपये असून, एका एकरात आठ हजार रोपे बसतात. त्यातून वार्षिक चार लाखांचे उत्पन्‍न मिळते. तीन बोअर व एका शेततळ्यावर ही शेती ते फुलवत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग कुडल येथील गुंडुराव पाटील, कुंभारीचे अमित ढोले यांच्याकडेही ही शेती आहे. गुंडुराव पाटील यांची जिरेनियमची नर्सरीही आहे. मुंबई येथे जिरेनियम तेलाची विक्री करण्यात येते. याशिवाय अन्यत्रही याची खरेदी केंद्रे आहेत.

 घोडातांड्यातील राजू राठोड यांचा जिरेनियम पिकाचा प्रयोग
घोडातांड्यातील राजू राठोड यांचा जिरेनियम पिकाचा प्रयोग
पारंपरिक शेतीला फाटा, अन्य शेतकर्‍यांनाही मार्गदर्शन

परम्यूम, कॉस्मेटिकसाठी वापर

सुगंधित जिरेनियम तेल उच्च दर्जाचे परफ्यूम आणि कॉस्मेटिक उद्योगांमध्ये वापरण्यात येणारा महत्त्वाचा घटक आहे. या तेलापासून अनेक सुगंधित पदार्थ, टॅल्कम पावडर, शाम्पू, अगरबत्ती, साबण, फेस वॉश क्रीम अशा वस्तू बनवल्या जातात. अनेक खाद्यपदार्थ अल्कोहोलिक आणि सॉफ्ट ड्रिंक मध्ये नॅचरल फ्लेवर म्हणूनही वापरतात. रक्‍तस्राव, जखमा, अल्सर आणि त्वचा विकारावर याद्वारे
आयुर्वेदिक उपचार करण्यात येतात. देशात सहा टन तेलाचे उत्पादनभारतामध्ये कॉस्मेटिक व सौंदर्यप्रसाधनांची खूप मोठी बाजारपेठ आहे. या उद्योगांसाठी जिरेनियम तेलाची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. भारत दरवर्षी 150 टन जिरेनियम तेल आयात करतो. त्यामानाने भारतामध्ये केवळ सहा टन तेलाचे उत्पादन होते. जागतिक बाजारपेठेत जिरेनियम तेलाची गरज 600 टन एवढी आहे. ती चीन, दक्षिण आफ्रिका, मोराक्को हे देश पूर्ण करतात.

काळी चिकनमातीची गरज

जिरेनियम शेतीसाठी दक्षिण भारतीय हवामान उत्तम असून या हवामानात मिळणार्‍या तेलाची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात व उत्तर प्रदेशचा मैदानी भाग या राज्यांमध्ये जिरेनियम शेती केली जाते. निचरा होणारी काळी चिकन मातीच्या जमिनीची याला गरज लागते. महाराष्ट्रातील हवामान व मृदा यासाठी उत्तम असून जिल्ह्यामध्ये जिरेनियम लागवड करता येते. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात रोपाच्या खालच्या फांद्या जमिनीला लागून कुजण्याची दाट शक्यता असते.

जिरेनियमवर प्रक्रिया करून तेल काढल्यानंतर.
जिरेनियमवर प्रक्रिया करून तेल काढल्यानंतर.

लागवडीचे तंत्र

जिरेनियम पीक बहुवार्षिक आहे. पाच ते सहा रुपयांप्रमाणे जिरेनियमची रोपे मिळतात. मागणी व पुरवठानुसार त्यांचे दर कमी अधिक होऊ शकतात. लागवडीसाठी सरासरी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. एकदा लागवड केल्यानंतर हे पीक तीन ते चार वर्षे उत्पन्‍न देते. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांत तीन फुटांपर्यंत रोपांची वाढ होऊन त्याला फुले येऊ लागली की, ते छाटणीसाठी तयार होतात. एकरी 10 ते 12 टन जिरेनियमचे उत्पन्‍न मिळते. एका टनाला 12 लिटर तेल निघते. तेलाचा सरासरी बाजार भाव 12 हजार 500 प्रतिलिटर एवढा आहे.

पिकाला कीड लागत नाही

जिरेनियमच्या रोपावर कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे या पिकावर कीटकनाशके व औषध फवारणीचा खर्च 80 टक्क्यांपर्यंत कमी होतो. त्या पिकाला जनावर खात नाही. पारंपरिक पिकांपेक्षा दुप्पट नफा मिळतो. आंतरपीक घेता येते. जिरेनियमपासून तेल निर्मिती, रोपांची निर्मिती व शिल्लक राहिलेल्या पाल्यापासून खत तयार करू शकतो. दुष्काळी भागात जिथे पाण्याची कमतरता आहे, तिथेही शेतकरी जिरेनियम शेती करता येते.

सरकारी योजना

जिरेनियम पिकासाठी कोणतीही सरकारी योजना नसली तरी जिरेनियम प्रक्रिया उद्योगासाठी सरकारी अनुदान योजना आहे. प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी 25 ते 30 टक्के अनुदान दिले जाते. महिलांना या योजनेमार्फत तीस टक्के, तर पुरुषांना 25 टक्के अनुदान दिले जाते.

विक्री व्यवस्थापन

शेतकरी जिरेनियम शेती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये करतात. असा पिकवलेला माल ते थेट कंपनीला विकतात. कंपनी शेतकर्‍याला रोपांच्या उपलब्धतेपासून तेल काढणीपर्यंत मदत करतात. ज्या शेतकर्‍यांकडे तीन डिस्टिलेशनची सोय नाही, असे शेतकरी जिरेनियमचा काढलेला माल पाच ते सहा हजार प्रतिटन या दराने विकतात.

ऑईलनिर्मिती प्रकल्प

जिरेनियम वनस्पतीच्या पालापासून ऑईलची निर्मिती करण्यात येते. हा कच्चा माल एखाद्या प्लांटला दिल्यानंतर त्याचे तेल काढता येते. वर्षापूर्वी प्रतिटन 6 हजार 500 रुपये याचा दर होता, आता यात हजार रुपयांनी दर कमी झाला असून, 5 हजार 500 रुपये प्रति टन दराने विक्री करण्यात येत आहे. इतरांना कच्चा माल देण्यापेक्षा ऑईल निर्मिती प्रकल्प टाकण्याचे धाडस करत राजू राठोड यांनी हा प्रकल्पही सुरू केला आहे. याला मदत करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतला, तरीही हार न मानता त्यांनी फायनान्स आणि मित्रांकडून मदत घेत हा प्रकल्प उभा केला आहे. यात जिरेनियम, पाम रोजा, निलगिरी, हळदीसह तेल काढता येते. काढलेल्या तेलाची विक्री मुंबई येथील एस. एच. केळकर सेंटरमध्ये केली जात आहे.

फ्रेंचमधून भारतात आगमन

जिरेनियमचे उगमस्थान दक्षिण आफ्रिका, मादागास्कर, इजिप्त, मोरोक्को हे सांगितले जाते. सतराव्या शतकात ही वनस्पती इटली, स्पेन व फ्रान्समध्ये पोहोचली व तिथून पुढे तिचा इतरत्र प्रसार आला. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच नागरिकांनी जिरेनियम भारतात आणले. जिरेनियम दक्षिण भारतीय हवामानाशी मिळतेजुळते असल्याने त्याची लागवड करण्यात आली. जिरेनियमच्या विविध 700 प्रजाती असून त्यातील फक्त 10 तांबडी व पांढरी फुले येणार्‍या प्रजाती तेल उत्पादनासाठी वापरल्या जातात.

– जगन्‍नाथ हुक्केरी, सोलापूर

पहा व्हिडिओ : सोलापूरच्या शेतकऱ्याने फुलवली सुगंधी शेती : चला पाहूया अत्तराच्या शेतीची गोष्ट

Back to top button