राष्ट्रवादीत ‘नथूराम’, मविआत ‘हे राम’! शरद पवारांकडून अमोल कोल्हेंच्या भूमिकेचे समर्थन - पुढारी

राष्ट्रवादीत ‘नथूराम’, मविआत ‘हे राम’! शरद पवारांकडून अमोल कोल्हेंच्या भूमिकेचे समर्थन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

‘व्हाय आय किल्ड गांधी?’ या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथूराम गोडसेच्या भूमिकेवरून राजकीय वादंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे शुक्रवारी समर्थन केले; तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे यांच्या गोडसेच्या उदात्तीकरणाला विरोध दर्शविला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीवर ‘हे राम’ म्हणण्याची नामुष्की ओढवली आहे.

कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका साकारत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पाहावे लागेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांचे समर्थन केले.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी?’ या चित्रपटावरून वाद सुरू झाला असून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधणार्‍या भाजप नेत्यांना उत्तर देत टोला लगावला.

भाजप नेते गांधीवादी कधीपासून झाले, असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकारांशी बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथूराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथूराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पाहावं लागेल.

तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह : जयंत पाटील

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी 2017 मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे. त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

आव्हाडांच्या भूमिकेचे जयंत पाटलांकडून समर्थन

अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसे यांची भूमिका केल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे, त्यावर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली. नथूराम गोडसेच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा निघत असेल तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

हा सिनेमा मी पाहिला नाही किंवा त्यांची भूमिका ही राष्ट्रवादीत येण्याअगोदरची आहे. मात्र त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहीत नाही, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

या भूमिकेवर लोकांच्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त होत आहेत. त्या चुकीच्या नाहीत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी 2017 साली ती भूमिका केली आहे. राष्ट्रवादीत ते त्यानंतर आले आणि लोकसभेची निवडणूक जिंकले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करून ते घराघरांत पोचले. शिवाय लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणेही केली आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

तो सिनेमा बघण्याची व वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. आमची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Back to top button