Stock Market | अर्थवार्ता- सेन्सेक्स- निफ्टी लाईफ टाईम हाय, ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ | पुढारी

Stock Market | अर्थवार्ता- सेन्सेक्स- निफ्टी लाईफ टाईम हाय, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्न )

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 186.80 अंक व 596.87 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 22513.7 अंक व 74248.22 अंकांच्या पातळीवर बंद झाले. सप्ताहात निफ्टीमध्ये एकूण 0.84 टक्के व सेन्सेक्समध्ये 0.81 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सप्ताहादरम्यान निफ्टीने 2261.9 अंक, तर सेन्सेक्सने प्रथमच 74501.73 अंकांच्या विक्रमी सर्वोच्च पातळ्यांना (लाईफ टाईम हाय) स्पर्श केला. सप्ताहादरम्यान सर्वाधिक वाढ दर्शवणार्‍या समभागांमध्ये डिव्हिज लॅब (8.8 टक्के), एचडीएफसी बँक (7 टक्के), श्री राम फायनान्स (6.7 टक्के), एनटीपीसी (5.6 टक्के), टाटा स्टील (4.8 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (4.8 टक्के) यांचा समावेश झाला, तर सर्वाधिक घट दर्शवणार्‍या समभागामध्ये हिरो मोटोकॉर्प (-4.2 टक्के), नेस्ले इंडिया (-3.2 टक्के), सिप्ला (-3.2 टक्के), भारती एअरटेल (-3.1 टक्के), ग्रासीम इंडस्ट्रीज (-2.2 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला.

संबंधित बातम्या 

या सप्ताहात रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक संपन्न झाली. सलग सातव्यांदा रेपो रेट दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला. रेपो रेट स्थिर ठेवण्याच्या बाजूने समितीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी मत दिले. देशातील महागाई दर 4 टक्क्यांवर आटोक्यात ठेवण्याचा पुनरुच्चार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केला. आर्थिक वर्ष 2025 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्था वृद्धीदराचा अंदाज 7 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला.

सरकारी कंपनी ‘टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंटस इंडिया’ आपला ‘भारती हेक्स्झाकॉम’ कंपनीमधील 15 टक्के हिस्सा आयपीओच्या मार्गाने विकणार. सरकारला या हिस्सा विक्रीच्या माध्यमातून 4,200 कोटींचा निधी मिळणार. भारती हेक्स्झाकॉम ही भारती एअरटेलची उपकंपनी आहे. सध्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंटचे भारती हेक्स्झाकॉममध्ये 150 दशलक्ष समभागांसह 30 टक्के हिस्सा आहे. विक्रीपश्चात हा हिस्सा 15 टक्क्यांपर्यंत खाली येईल.

मार्च महिन्यात सरकारला जीएसटीद्वारे तब्बल 1 लाख 78 हजार कोटींचा निधी प्राप्त झाला. मागील वर्षाच्या तुलनेत या महिन्यात कर संकलनात 11.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. आतापर्यंतच्या इतिहासात एका महिन्यात झालेले हे सर्वाधिक दुसर्‍या क्रमांकाचे कर संकलन आहे. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये सर्वाधिक कर संकलन झाले होते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीएसटीचे तब्बल 20 लाख 18 हजार कोटींचे कर संकलन झाले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर संकलनात 11.7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

परदेशी गुंतवणूकदारांनी (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स) आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय भांडवल बाजारात एकूण तब्बल 2 लाख 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यामुळे मागील आर्थिक वर्षात निफ्टीने 29 टक्के, तर सेन्सेक्सने 25 टक्क्यांचा परतावा दिला.

आंतरराष्ट्रीय विद्युत चारचाकी उत्पादक कंपनी टेस्ला भारतात वाहननिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या तयारीत. एकूण सुमारे 3 अब्ज डॉलर्सची (सुमारे 25 हजार कोटींची) गुंतवणूक या माध्यमातून भारतात येण्याची शक्यता. प्रकल्प उभारणीसाठी कंपनीतर्फे तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत चाचपणी करण्यात येत आहे.

बायजू या आर्थिक संकटात सापडलेल्या स्टार्टअपला आपली उपकंपनी आकाश एज्युकेशनमधील हिस्सा विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला. राजन पै यांच्या ‘एमइएमजी फॅमिली ऑफिस’ कंपनीचे 42 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज थकवल्याचा आरोप. या कर्जाच्या बदल्यात आकाश एज्युकेशनचे समभाग एमइएमजी कंपनीला मिळणार होते; परंतु बायजूजने परस्पर हिस्सा विक्री करण्यास एमइएमजीचा विरोध आहे.

नवीन आर्थिक वर्षात सोने-चांदी चमकले. गुढीपाडवा जवळ आला असताना 10 ग्रॅम सोन्याच्या भावाने 70 हजारांचा टप्पा गाठला. चांदीच्या दरानेदेखील प्रतिकिलो 76 हजारांपर्यंत मजल मारली. यामुळे सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. ‘एमसीएक्स’ या स्टॉक एक्स्चेंजवरदेखील जून महिन्याच्या एक्सपायरीमध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या भावाने 70,699 रुपये प्रतिदहा ग्रॅम किमतीची उच्चांकी पातळी गाठली. सोने-चांदीचे भाव वाढण्यामागे अमेरिकन फेडरल बँक जूनमध्ये व्याज दर कपात करण्याची शक्यता. तसेच इस्रायलमधील, युद्ध रशिया – युके्रनमधील युद्ध ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. याचसोबत मागील काही आठवड्यांत चीन आणि भारत देशांनी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने खरेदीचा सपाटा लावल्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाली. अर्थव्यवस्था तेजीत असताना अथवा भविष्यात मंदी आल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय बाजारातून सोने खरेदी करून आपला साठा वाढवण्यावर भर देत असतो.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये ‘नॅशनल पेन्शन स्कीम’मधील (एनपीएस) व्यवस्थापनअंतर्गत भांडवलमूल्याने (एयूएम) तब्बल 30 टक्क्यांची वाढ दर्शवली तसेच या योजनेमध्ये तब्बल 10.3 दशलक्ष (1 कोटीपेक्षा अधिक) नवीन गुंतवणूकदारांची भर पडली. 31 मार्चअखेर एनपीएसचे भांडवलमूल्य तब्बल 11.73 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

व्होडाफोन-आयडिया कंपनी लवकरच इक्विटी (समभाग) सेल (विक्री) माध्यमातून 20 हजार कोटींचा निधी उभा करणार. यामुळे कंपनीच्या प्रवर्तकांचा सध्या असलेला कंपनीतील 50 टक्क्यांचा हिस्सा 40 टक्क्यांपर्यंत खाली येणार. सध्या कंपनीचे प्रवर्तक (प्रोमोटर) आदित्य बिर्ला गु्रप व व्होडाफोन ग्रुपचा एकत्रितपणे कंपनीमध्ये 48.91 टक्क्यांचा हिस्सा आहे. व्होडाफोन-आयडिया कंपनीला थकीत करांपोटी सरकारला 28 हजार कोटींचा कर देणे अपेक्षित आहे आणि याची मुदत आर्थिक वर्ष 2026 मध्ये संपत आहे. म्हणून थकीत कर भरणा करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

29 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी तब्बल 2.951 अब्ज डॉलर्सनी वधारून आतापर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर म्हणजे 645.583 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये गंगाजळी 642.453 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. भारताचा सोन्याचा साठादेखील 673 दशलक्ष डॉलर्सनी वधारून 52.16 अब्ज डॉलर्स झाला.

Back to top button