Closing Bell | बाजारावर दबाव कायम! सेन्सेक्स ३१६ अंकांनी घसरला, ऑटो, पॉवर, मेटलची स्थिती काय?

Closing Bell | बाजारावर दबाव कायम! सेन्सेक्स ३१६ अंकांनी घसरला, ऑटो, पॉवर, मेटलची स्थिती काय?

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या चिंतेमुळे आशियाई बाजारात झालेली घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या सततच्या शेअर्स विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार मंगळवारी कमजोर पडला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ४११ अंकांनी घसरून ६५,४१६ पर्यंत खाली आला. तर निफ्टी ५० १९,५०० वर राहिला. सेन्सेक्स ३१६ अंकांच्या घसरणीसह ६५,५१२ वर बंद झाला. तर निफ्टी १०९ अंकांनी घसरून १९,५२८ वर स्थिरावला. आज सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून आली. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीयमध्ये एफएमसीजी (FMCG), ऑटो, पॉवर, मेटल, ऑईल आणि गॅस हे ०.५-१ टक्क्यांनी घसरले. तर PSU बँक निर्देशांक २.३ टक्क्यांनी आणि कॅपिटल गुड्स निर्देशांक १ टक्क्याने वाढला. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वधारला.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स आज ६५,८१३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,३४४ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर मारुती, एनटीपीसी, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एम अँड एम, आयटीसी, टाटा स्टील, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले. तर बजाज फायनान्स, टायटन, एलटी, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले.

निफ्टी ५० वर ओएनजीसी, आयशर मोटर्स, हिंदाल्को, मारुती, डॉ. रेड्डी हे टॉप लूजर्स ठरले. बजाज फायनान्स, टायटन, एलटी, बजाज फिनसर्व्ह हे तेजीत राहिले. (Stock Market Closing Bell)

JSW इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरचे दमदार लिस्टिंग

आयपीओला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर JSW इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरचे आज मंगळवारी दमदार लिस्टिंग झाले. आयपीओच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर (jsw infrastructure share price) २४ रुपयांनी अधिक १४३ रुपयांवर लिस्ट झाला आहे. कंपनीने या इश्यूची किंमत प्रति शेअर ११३-११९ रुपये ठेवली होती. JSW इन्फ्रा हा JSW समूहाचा गेल्या १३ वर्षांतील पहिला IPO ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. २५-२७ सप्टेंबर हा आयपीओ ३७ वेळा सबस्क्राइब झाला होता. या आयपीओतून २८०० कोटी रुपयांची उभारणी करण्याचे कंपनीचे नियोजन होते.

आयशर मोटर्स, मारुती सुझुकीचे शेअर्स घसरले

आज एनएसई (NSE) वर आयशर मोटर्सचे शेअर्स (Eicher Motors Share Price) सुमारे ४ टक्क्यांनी घसरून दिवसाच्या निचांकी ३,३०३ रुपयांवर आले. दुपारच्या व्यवहारात ही घसरण थांबून शेअर्स ३,३४५ रुपयांवर पोहोचले. तर मारुती सुझुकीचे शेअर्स (Maruti Suzuki India Share Price) ३ टक्क्यांनी घसरून १०,३२४ रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर या शेअर्समध्ये सुधारणा होऊन तो १०,३६२ रुपयांवर पोहोचला. या कंपन्यांच्या सप्टेंबरमधील विक्रीचे आकडे समोर आल्यानंतर त्यांचे शेअर्स घसरले आहेत.

जागतिक बाजार

अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या अधिकार्‍यांनी व्याजदर आणखी काही काळ उच्च राहतील असे मत व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद आशियाई बाजारात उमटले. आशियाई बाजारात घसरण दिसून आली. जपानचा निक्केई १.६ टक्के घसरला, तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ३.२ टक्क्यांनी खाली आला. गोल्डन वीक हॉलिडेमुळे चिनी बाजार आठवडाभर बंद आहेत. दरम्यान, अमेरिका सरकारने शटडाऊन टाळण्यासाठी डील करूनही सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र परिणाम दिसून आला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज ०.२ टक्क्यांनी घसरला. तर ब्रॉड-बेस्ड S&P 500 सपाट राहिला. तर टेक-रिच नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) खरेदीचा सिलसिला थांबवत सप्टेंबरमध्ये १४,७६८ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. परदेशी गुंतवणूकदार गेल्या नऊ सत्रांत विक्रेते राहिले आहेत. त्यांनी शुक्रवारी १,६८६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news